नागपूर : चातुर्मासाच्या अनुषंगाने रविवारपासून दिगंबर जैन समाजाच्या पर्युषणपर्वास प्रारंभ झाला. शासन-प्रशासनाने निर्देशित केलेल्या नियमांचे पालन करत नागरिकांनी घरूनच ईश्वर उपासना केली. टाळेबंदीच्या काळापासूनच मंदिरे बंद असल्याने श्रावक-श्राविकांना प्रवेशाची परवानगी देण्यात आली नाही.
पर्युषणपर्वाच्या आधीच हे प्रतिबंध संपेल अशी आशा होती. मात्र तसे झाले नाही. शासनाच्या आदेशाचे पालन केले जात असल्याने मंदिरांमध्ये भक्तांना प्रवेश देण्यात आले नाही. घरूनच अर्चना-उपासना करण्याचे आवाहन करण्यात आल्याचे इतवारी लाडपुरा येथील श्री दिगंबर जैन सेनगण मंदिराचे अध्यक्ष सतीश जैन पेंढारी यांनी सांगितले. तसेच आवाहन इतवारी, शहीद चौक येथील श्री पार्श्वप्रभू दिगंबर सैतवाळ जैन मंदिरातूनही करण्यात आले. टाळेबंदीपासूनच मंदिराचे पाट उघडण्यात आले नसल्याचे अध्यक्ष दिलीप शिवणकर यांनी सांगितले. शासनाच्या आदेशाचे पालन केले जात आहे. साधूसंतांनीही पर्युषणपर्वात कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन न करण्याचे संदेश आधीच दिले होते. त्यांच्या आदेशांचे पालन करूनच सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याचे शिवणकर यांनी सांगितले. अनंत चतुर्दशीच्या दिवशीही मंदिरांमध्ये वंदन करण्यासाठी कुणीच घरून बाहेर न पडण्याचे आवाहन दिलीप शिवणकर यांनी केले आहे. प्रशासनाने पर्यूषण पर्वाच्या काळात दोन दिवस मंदिरे उघडण्याची परवानगी शिवणकर यांनी जिल्हा प्रशासनाकडे मागितली आहे.जैन समाजात पर्युषणपर्वाचे विशेष महत्त्व आहे. जैन धर्मातील हा सर्वात मोठा सण असून, याला दशलक्षण पर्वही म्हटले जाते. त्यागाचे पर्व, आत्मशुद्धीचे हे पर्व आहे. जैन समाजात या काळात लहान, मोठे सर्वच जण पूजन, अभिषेक, व्रत, आराधनेत व्यस्त असतात. अनेक भक्त जिनेंद्र भगवानचे अभिषेक, पूजन केल्यानंतरच पाणी किंवा भोजन ग्रहण करत असतात. रविवारी पर्युषणपर्वास प्रारंभ झाल्याने अनेक भक्त मंदिरात आले होते. मात्र, मंदिरे बंद असल्याने त्यांच्या हाती निराशाच लागली.विजय दर्डा यांचे आवाहनअखिल भारतीय सकल जैन समाजातर्फे १३ ऑगस्टला आपात्कालीन ‘डिजिटल’ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय दर्डा यांनी जैन समाजाला पर्युषणपर्व काळात मंदिरे बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. या काळात देवस्थानांना उघडण्याची परवानगी देण्यात आल्यास भक्तांना थांबवणे कठीण जाणार आहे. म्हणूनच या काळात कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन न करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यांच्या आवाहनाचे गांभीर्य लक्षात घेता नागपुरात सर्व मंदिरे बंदच ठेवण्यात आली.