नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ आणि इतर कनिष्ठ न्यायालयांमध्ये नियमित कामकाज सुरू करण्यात यावे, अशी मागणी बुधवारी करण्यात आली. वकिलांच्या शिष्टमंडळाने मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन सादर केले.
कोरोना संक्रमणामुळे न्यायालयातील नियमित कामकाज गेल्या वर्षी मार्च ते नोव्हेंबरपर्यंत बंद होते तर, यावर्षी मार्चपासून बंद आहे. सध्या केवळ महत्त्वाच्या व तातडीच्या प्रकरणांवर ऑनलाइन सुनावणी केली जात आहे. त्यामुळे वकिलांची गैरसोय होत आहे. त्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आता नागपुरातील कोरोना संक्रमण कमी झाले आहे. परिणामी, आवश्यक अटी लागू करून नियमित कामकाज सुरू करण्यात यावे अशी विनंती शिष्टमंडळाने केली. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी या निवेदनावर सकारात्मक विचार करून आवश्यक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात ॲड. एम. जी. भांगडे, ॲड. सुबोध धर्माधिकारी, ॲड. सुनील मनोहर, ॲड. आनंद जयस्वाल, ॲड. एस. के. मिश्रा, ॲड. आर. एल. खापरे, ॲड. मुकेश समर्थ (सर्व वरिष्ठ वकील), हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या अध्यक्ष ॲड. गौरी वेंकटरमण, सचिव ॲड. प्रफुल्ल खुबाळकर, उपाध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम पाटील, ॲड. सुधीर पुराणिक आदींचा समावेश होता.