लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : स्टुडन्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया(एसएफआय)च्या वतीने नगर परिषदेंतर्गत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालये सुरू करा, या मागणीसाठी न.प. मुख्याधिकारी हर्षल गायकवाड यांना गुरुवारी (दि.१२) निवेदन दिले. तत्पूर्वी एसएफआयतर्फे नगर परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या ५८ विद्यार्थी कुटुंबाना भेटी देऊन समस्या जाणून घेतल्या. काेराेनाचे नियम पाळत शाळा सुरू व्हाव्यात, अशी पालकांची इच्छा असून, ५८ पालकांनी निवेदनावर स्वाक्षरी केल्या आहेत.
विद्यार्थी गृहभेटीदरम्यान माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या एका कुटुंबातील विद्यार्थिनीने पुढे शिक्षण न घेण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा साेडण्याचा दाखला घेण्याकरिता शाळेत गेल्याची बाबही तिने सांगितली. आर्थिक अडचणीमुळे काही पालक मुलांना माेबाईल घेऊन देऊ शकत नाही. इंटरनेटचा खर्च वाढणार, काही पालकांनी माेबाईल घेऊन दिला तर मुलांना माेबाईलचीच सवय लागून अभ्यास साेडून इतर बाबी बघतात, अशा विविध समस्या पालकांनी मांडल्या. नगर परिषद शाळेत शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याचे एसएफआयचे अमित हटवार यांनी सांगितले.
काेराेनामुळे आभासी शिक्षण पद्धतीत बहुतेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकले जाण्याची शक्यता वाढत आहे. दुसरीकडे बालविवाह, बालमजुरी असे प्रश्न ऐरणीवर येत आहेत. त्यामुळे नगर परिषदस्तरावर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी ओळखून ऑफलाईन पद्धतीने शिक्षण कसे देता येईल, याबाबत विचार करावा तसेच काेराेनाचे नियम पाळत शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन देताना अमित हटवार, राम येलके, सागर वाहणे, प्रीतम वासनिक व कार्यकर्ते उपस्थित हाेते.