-जनहित युवा मोर्चाची मागणी
नागपूर : लॉकडाऊनमुळे जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयातील बंद केलेली स्टॅम्प पेपर विक्री व ॲफिडेव्हिट काउंटर तात्काळ सुरू करण्याची मागणी जनहित युवा मोर्चाने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासोबतच निराधार वृद्ध, दिव्यांग व्यक्ती, विधवा महिला, अनाथ मुलांसाठी असलेली संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनांची एक ते दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली प्रकरणे तात्काळ मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांना स्टॅम्प पेपर व शपथपत्रांसाठी मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. नातेवाइकांना मृतकाच्या एलआयसी पॉलिसीचे क्लेम करण्यासाठी, नोकरी करीत असलेल्या ठिकाणी वारसांसाठी विविध शपथपत्रे सादर करावी लागत आहेत; परंतु विक्री व काउंटर बंद असल्याने स्टॅम्प पेपर विक्रेते घरूनच अवाच्या सव्वा दरात स्टॅम्प पेपर विकत आहेत. शिवाय, महा ई-सेवा केंद्रांतूनही शपथपत्रांचे अवाजवी दर आकारत आहेत. आधीच कोरोनाने त्रस्त आणि त्यात आर्थिक पिळवणूक सुरू आहे. हे बंद व्हावे आणि विविध योजनांचा लाभ पीडितांना मिळावा, यासाठी स्टॅम्प पेपर विक्री व ॲफिडेव्हेट काउंटर तात्काळ सुरू करण्याची मागणी मोर्चाचे अध्यक्ष शिवशंकर ताकतोडे, कार्याध्यक्ष पद्माकर बावणे, महासचिव ॲड. सचिन मेकाले, उपाध्यक्ष ऋषी अव्हाडकर यांनी केली आहे.
..............