नागपूर : समाज कल्याण विभागामार्फत चालविण्यात येणारे वसतिगृह तत्काळ सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. शुक्रवारी विविध संघटना व ३०० च्यावर विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय विभागाचे आयुक्तांमार्फत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन साेपविण्यात आले.
मेडिकल, पॅरामेडिकल, नर्सिंग, बीएससीचे प्रात्याक्षिकचे वर्ग सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांना प्रात्याक्षिकासाठी महाविद्यालयात येणे अनिवार्य केले आहे. अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांना प्रात्याक्षिक आणि इंटर्नशीप करणे अनिवार्य आहे. त्यासाठी बाहेर गावच्या शेकडाे विद्यार्थ्यांना भाड्याने खाेली करून शहरात राहण्याशिवाय गत्यंतर नाही. पॅरामेडिकलच्या प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काेराेना, डेंग्यू व इतर आजाराच्या गरजेसाठी शिक्षणाच्या नावावर त्यांच्याकडून काम करवून घेतले जात आहे. त्यांना मानधनही देण्यात येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागताे आहे. हलाखीची परिस्थिती असताना त्यांना कर्ज घेऊन भाड्याने राहावे लागत आहे. त्यामुळे मेडिकल, पॅरामेडिकल व इतर अभ्यासक्रमातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह तत्काळ सुरू करावे, मागील दीड वर्षांपासून भाडे तत्त्वावर राहणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेत ग्राह्य धरून लाभ देण्यात यावा आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
यावेळी भन्ते अभयनायक, मानव अधिकार संरक्षण मंचचे आशिष फलझेले, दि प्लॅटफॉर्मचे राजीव खोब्रागडे, निखिलेश मेश्राम, समता सैनिक दलाचे नागसेन बडगे, रिपब्लिकन आघाडीचे संजय पाटील, बहुजन समाज पार्टीच्या वर्षा वाघमारे, आयएडब्लूएफच्या सुषमा कळमकर, रिता बागडे आदींच्या नेतृत्वात शेकडाे विद्यार्थी सहभागी हाेते.