नागपूर : संघर्षनगर, भांडेवाडी डम्पिंग यार्ड, चांदमारी मंदिर, बिीडगाव टी-पॉईंट व वाठोडा घाट या भागातील तीन सिमेंट रोडच्या कामाला तीन आठवड्यात सुरुवात करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महानगरपालिकेला दिला. तसेच, यासंदर्भात आणखी आवश्यक आदेश देण्यासाठी या रोडवर विस्तृत माहिती सादर करण्यास सांगितले.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या तीन रोडच्या विकासाकरिता चंद्रशेखर पिल्लई व इतरांनी जनहित याचिका दाखल केली आहे. संबंधित रोड अत्यंत खराब झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या तीन रोडच्या विकासावर ८ कोटी ९४ लाख ६४ हजार ७६ रुपये, ३ कोटी ९१ लाख ५१ हजार ५१० व ५ कोटी ८३ लाख २८ हजार ५९७ रुपये खर्च येणार आहे. ही संपूर्ण रक्कम राज्य सरकार देणार आहे. असे असताना मनपाने रोडची कामे सुरू करण्यावर उदासीन भूमिका घेतली आहे. रोडच्या कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ३० ऑक्टोबर २०१९ रोजी मे. एस. के. गुरबक्षानी यांची बोलीही स्वीकारण्यात आली आहे. परंतु, सरकारकडून निधी मिळाला नसल्यामुळे त्यांना अद्याप कार्यादेश जारी करण्यात आला नाही. न्यायालयाने ही परिस्थिती लक्षात घेता मनपाला निधीची चिंता करण्याची गरज नाही, अशी समज दिली. राज्य सरकारने निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मनपाने रोडची कामे सुरू करायला पाहिजे. काम सुरू केल्याशिवाय सरकारकडून निधी मिळण्याची अपेक्षा करता येणार नाही, असे न्यायालयाने नमूद करून वरील आदेश दिला. प्रकरणावर आता ५ जानेवारी रोजी पुढील सुनावणी होईल. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. पी. व्ही. घारे तर, मनपातर्फे ॲड. गिरीश कुंटे यांनी कामकाज पाहिले.
---------------
रहिवाशांविषयी चिंता व्यक्त
उच्च न्यायालयाने संबंधित रोडच्या दुरवस्थेची छायाचित्रे पाहिल्यानंतर परिसरातील रहिवाशांविषयी चिंता व्यक्त केली. तिन्ही रोड अत्यंत खराब झाले आहेत. रोडवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. रोड उंचसखल झाले आहेत. त्याचा परिसरातील रहिवाशांना किती मनस्ताप होत असावा, याची कल्पना करू शकत नाही. त्यामुळे मनपाने आता तरी जागे होऊन रोडची कामे सुरू करण्यासाठी आणखी वेळ करू नये, असे न्यायालय म्हणाले.