लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : राष्ट्रीय मार्गाचा दर्जा मिळालेल्या नागपूर-गडचिरोली मार्गाचे उमरेडपर्यंतचे काम पूर्णावस्थेत असून, आता उमरेड-भिवापूर-नागभीडपर्यंतच्या रस्ता निर्मितीच्या कामाला तत्काळ सुरुवात करण्यात यावी, अशी मागणी माजी आ. सुधीर पारवे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नुकतेच निवेदन दिले.
नागपूर-गडचिरोली मार्गाला राष्ट्रीय मार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर या मार्गाच्या निर्मितीचे काम अनेक वर्षे थंडबस्त्यात होते. त्यामुळे अपघात व मृत्यूच्या मालिकेने हादरून साेडले हाेते. दरम्यान, २०१९ च्या अखेरीस पहिल्या टप्प्यात नागपूर ते उमरेड चौपदरीकरणाच्या कामाला प्रारंभ झाला. सद्य:स्थितीत काही किरकोळ कामे वगळता नागपूर ते उमरेड चौपदरीकरण पूर्णावस्थेत आहे. मात्र, उमरेड ते भिवापूर आणि पुढे नागभीडपर्यंत अरुंद व खड्डेमय मार्गाने प्रवास करावा लागतो. उमरेड ते नागभीड राष्ट्रीय मार्ग ३५३ डीके कि.मी. ५४.३८५ ते ९६.४४५ च्या दोन पदरी मार्गाच्या निर्माण कार्याची निविदा काढून निर्मितीच्या कामाला तत्काळ सुरुवात करण्याची मागणी पारवे यांनी निवेदनातून केली आहे. या मार्गाच्या कामाला सुरुवात झाल्यास स्थानिकांचा प्रवास सुखकर होणार आहे.
....
रेल्वेची चाके थांबली, मार्गावर वर्दळ वाढली
नागपूर-नागभीड नॅरोगेजला ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्याच्या कामाला सुरुवात झाल्याने या रेल्वेमार्गाने धावणाऱ्या लोकप्रिय ‘शकुंतले’ची चाके वर्षभरापासून थांबली आहे. त्यामुळे नागपूर-उमरेड-भिवापूर-नागभीड या अरुंद व खड्डेमय मार्गावर वर्दळसुद्धा वाढली आहे. एकूणच नागपूर-उमरेडप्रमाणे उमरेड ते नागभीडपर्यंतच्या चाैपदरीकरण रस्ता निर्मितीच्या कामाला सुरुवात करणे आवश्यक आहे.