नागपूर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई देवस्थानाच्या विकास आराखड्याची कामे कधी सुरु होणार असा प्रश्न शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी विचारला आहे. तसेच देवस्थन विकास आराखड्याची कामे लवकर सुरू करा, अशी मागणी करत क्षीरसागर यांनी सभागृहाबाहेर निदर्शनही केले.
अंबाबाई देवस्थानच्या ३०० कोटींच्या विकास आराखड्याला शासनाने मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यातील विकास कामाकरिता ८० कोटीचा विकास आराखडा मंजूर केला. पण अद्यापही कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी कोणत्याही सोयी उपलब्ध नसल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरीत लक्ष देऊन विकास कामे सुरू करावीत, अशी मागणीही क्षीरसागर यांनी केली.