नागपूर : लोकसभा निवडणुकीत पक्ष विरोधी भूमिका घेणाऱ्यांवर कारवाईचा दणका देण्यास प्रदेश काँग्रेसने सुरुवात केली आहे. याच अंतर्गत जालना येथील माजी आमदार नारायणराव मुंडे, त्यांचे पूत्र प्रदेश सरचिटणीस सत्संग मुंडे व अकोला येथील प्रदेश सचिव प्रशांत विश्वासराव गावंडे यांना सहा वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात काम केल्याच्या तक्रारी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे प्राप्त होत आहेत. या तक्रारींची पटोले हे स्वत: शहानीशा करीत आहेत. स्थानिक पातळीवरून माहिती घेत आहेत. तक्रारीत तत्थ्य आढळून आले तर संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याचे धोरण पटोले यांनी स्वीकारले आहे.
जालना व अकोला या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार रिंगणात होते. जालन्यात काँग्रेसचे कल्याण काळे यांचा विजय झाला तर अकोल्यात डॉ. अभय पाटील यांचा पराभव झाला. निकालानंतर या दोन्ही मतदारसंघात स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्ष विरोधी कारवाई केल्याची तक्रार आली. याची प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी दखल घेत संबंधितांना सहा वर्षांपासाठी पक्षातून निलंबित केले. गुरुवारी या संबंधिचे आदेश प्रदेश उपाध्यक्ष (संघटन व प्रशासन) नाना गावंडे यांनी जारी केले.