नागपूर : विधानसभेच्या निवडणुका पार पाडल्यानंतर राज्यात युतीमध्ये फाटाफूट झाली. त्याचा परिणाम आता स्थानिक राजकारणावर पडत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेला सहभागी करून घ्यायला तयार नाही. त्यामुळे शिवसेना स्वबळावर लढत आहे. त्याचा फटका जागोजागी भाजपाला बसत आहे. तर शिवसेनेच्या गडात भाजपामुळे सेनेला पराभूत व्हावे लागत आहे. याची जाणीव स्थानिक नेत्यांबरोबरच कार्यकर्त्यांना आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी सहभागी करून घ्यायला तयार नाही, भाजपासोबत युती होऊ शकत नाही. त्यामुळे स्थानिक शिवसैनिक हतबल असून, युती व्हावी अशी कुजबूज कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे.
नुकताच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा वरचष्मा दिसून आला. पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या झंझावातामुळे काँग्रेसला यश मिळाले. असे असले तरी प्रत्यक्षात काँग्रेसला शिवसेनेचा बूस्ट मिळाल्याचे आकडेवारीवरूनच दिसून येते. महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक पक्ष असतानाही शिवसेनेला स्वबळाची भूमिका घ्यावी लागली. ती भूमिका काँग्रेससाठी ऊर्जावान ठरली तर भाजपसाठी चांगलीच मारक ठरली. पण जिथे शिवसेना हमखास निवडून येऊ शकते तिथे सेनेने स्वत:च्या पायावर दगड मारून घेतला.
- त्यामुळे जिल्हा परिषदेत १ जागेवर शिवसेना थांबली
जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेच्या मतांचे आकलन केले असतात. रामटेक, पारशिवनी, मौदा येथे शिवसेनेच्या उमेदवाराने दुसऱ्या क्रमांकाचे मते घेतली. नरखेडमध्ये दोन सर्कलमध्ये सेना दुसऱ्या क्रमाकांवर होती. कळमेश्वरमध्ये ३ सर्कलमध्ये सेना तिसऱ्या क्रमांकावर होती. हिंगण्यात ४ जागांवर तिसऱ्या क्रमांकावर तर उमरेडमध्ये एका जागेवर दुसऱ्या आणि भिवापूर व कुहीमध्ये सेना तिसऱ्या क्रमांकावर राहिली. सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी निवडून आलेल्या बहुतांश जागांवर भाजप, सेनेच्या उमेदवारांचे मताधिक्य विजयी उमेदवारापेक्षा जास्त होते. त्याचा परिणाम सार्वत्रिक निवडणुकीत सेना केवळ एका जागेवर थांबली.
- पोटनिवडणुकीतही तोच कित्ता गिरवला
काँग्रेस, राष्ट्रवादीने सोबत न घेतल्याने शिवसेनेने स्वबळावर जिल्हा परिषद व पंचायत समिती लढली. त्यामुळे भाजप-सेनेच्या मतांची विभागणी झाली. सेनेने १० उमेदवार रिंगणात उतरविले होते. यात करंभाड, अरोलीमध्ये सेनेचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला. तर चार सर्कलमध्ये सेनेचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला. पंचायत समितीतही पारशिवनी व रामटेकमध्ये सेनेचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले. मौद्यातील एका पंचायत समितीत भाजप व सेनेच्या उमेदवाराला सारखे मते पडली. मौदा, नागपूर ग्रामीण, हिंगणा, कुही, भिवापूर येथील काही पंचायत समितीत सेना आणि भाजपाचे मताधिक्य निवडून आलेल्या उमेदवारापेक्षा जास्त होते. त्यामुळे पंचायत समितीत सार्वत्रिक निवडणुकीत सेनेकडे असलेल्या दोन जागा पोटनिवडणुकीत सेनेला कायम ठेवता आल्या नाही.