निशांत वानखेडे
नागपूर : बारावीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका करण्याचा राज्य शिक्षण मंडळाचा प्रघात यावेळीही कायम आहे. यावेळी चुक नाही तर घाेळचुक केली आहे. प्रश्नपत्रिकेत प्रश्न छापण्याऐवजी पेपर तपासणाऱ्या शिक्षकांना देण्यात येणाऱ्या ‘माॅडेल आन्सर’च्या सुचना छापून आल्या आहेत. यामुळे आधीच टेन्शनमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचा गाेंधळ उडाला असून बहुतेकांनी प्रश्नच साेडून दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे ६ गुणांचे हाेणारे नुकसान लक्षात घेता सर्वांना सरसकट गुण बहाल करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली. पहिला पेपर इंग्रजीचा हाेता. काेराेनाच्या प्रभाव ओसरल्यानंतर पहिल्यांदा सामान्यपणे १०० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा हाेत आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रात जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर आधीच दडपण हाेते. अशावेळी गाेंधळवून टाकणारी काेणतीही गाेष्ट विद्यार्थ्यांचे नुकसान करणारी आहे. मंडळाने थेट प्रश्नपत्रिकेतच हा गाेंधळ घातला आहे. बारावीच्या इंग्रजी विषयाचे शिक्षक व तज्ज्ञ सपन नेहराेत्रा यांनी मंडळाच्या प्रश्नपत्रिकेतील चुकीच्या प्रश्नावर प्रकाश टाकला.
इंग्रजी विषयाकरिता ८० गुणांची कृतिपत्रिका असते. नेहराेत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक ३ मध्ये १४ गुणांसाठी कवितेवर आधारित प्रश्न विचारले आहेत. या प्रश्न क्रमांक ३ अंतर्गत ए-३, ए-४ व ए-५ या तीन कृतींमध्ये प्रश्नांऐवजी सूचनासह चक्क उत्तरे छापून आली आहेत. या तीन कृतींमध्ये बोर्डाने तयार केलेल्या ‘मॉडेल आन्सर’ मधील ए-३ व ए-५ यात शिक्षकांना देण्यात येणाऱ्या सुचना व ए-४ कृतीमध्ये माॅडेल ऑन्सरचे उत्तर जशाच्या तसे छापण्यात आले आहे. उत्तर छापले असले तरी अशा प्रकारामुळे विद्यार्थ्यांचा गाेंधळ उडाला हाेता. आधीच टेन्शमध्ये असलेले विद्यार्थी संभ्रमात गेले. प्रश्न समजण्यात विद्यार्थ्यांचा वेळही गेला. बहुतेक विद्यार्थ्यांनी हा प्रश्नच साेडून दिला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे ६ गुणांचे नुकसान झाले आहे.
प्रश्नपत्रिकेतील चुकीच्या प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेला, गाेंधळ झाला व त्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. त्यामुळे इंग्रजीचा पेपर दिलेल्या परीक्षार्थीना सरसकट 6 गुण देण्यात यावे. - प्रा. सपन नेहरोत्रा, इंग्रजी विषय तज्ज्ञ
तरी कशी हाेते चुक?राज्यातील ९ विभागाचे संबंधित विषयाचे ९ तज्ज्ञ माॅडेल प्रश्नपत्रिका तयार करतात व त्या निरीक्षकाकडे पाठवितात. हे सर्व गाेपनीय असते. त्यातून ३ माॅडेल प्रश्नपत्रिका तयार हाेतात व अभ्यास मंडळाकडे जातात. त्यातून एक प्रश्नपत्रिका अंतिमत: निवडली जाते. ही प्रक्रिया अतिशय गाेपनीय असते. मात्र अनेक तज्ज्ञांच्या नजरेखालून जात असताना, अशी चुक का हाेते, हा प्रश्न आहे. ही घाेळचुक आहे. यामध्ये पेपर सेटरपासून ऑब्जर्व्हरपर्यंत दाेषींवर कारवाई करण्यात यावी व विद्यार्थ्यांना सरसकट गुण देण्यात यावे. - सुनील राेडे, मुख्याध्यापक व इंग्रजीचे तज्ज्ञ.