लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खत अनुदानाचा निर्णय घेऊन केंद्र शासनाने कोट्यवधी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. त्याचे श्रेय घेण्याचा महाराष्ट्र शासनाने प्रयत्न करू नये. उलट राज्यातील लाखो शेतकऱ्यांना राज्य शासनाने सुलभतेने खत उपलब्ध करून द्यावे. शिवाय खरीप हंगामातील मशागतीच्या कामासाठी १० हजार रुपयांचे सरसकट रोख अनुदान तातडीने द्यावे, अशी मागणी भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
महाविकास आघाडीशी संबंधित काही नेते शेतकऱ्यांचा पुळका आल्याचे दाखवतात. त्या नेत्यांनी सरकारकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी प्रयत्न केले पाहिजे. दर वर्षी काळाबाजार, साठेबाजी आणि आर्थिक अडवणूक यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेएवढे खत राज्यात उपलब्ध होत नाही. गेल्या वर्षीही खताच्या कृत्रिम टंचाईमुळे शेतकरी नाडला गेला होता. तशी वेळ येऊ नये यासाठी राज्य सरकारने खत वितरणाची प्रणाली आखून द्यावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली.