नागपूर : जलअभ्यासक प्रवीण महाजन यांना ‘जलभूषण पुरस्कार’ महाराष्ट्र शासनाकडून जाहीर करण्यात झाला आहे.
माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांच्या स्मृत्यर्थ जलसंपदा, मृद व जलसंधारण तसेच पाणी पुरवठा व स्वच्छता या क्षेत्रात तळागाळात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.
शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला १३ जुलै रोजी मुंबईत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. २ लाख रुपये, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रवीण महाजन मागील २८ ते ३० वर्षापासून पाणी क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. लोकसंवाद, लोक शिक्षण व लोकसहभाग या माध्यमातून जलजागृती, सातत्याने जलकार्य लेखन, शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहचावे यासाठी कार्य, वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पासाठी पाठपुरावा, गाळयुक्त शेती आणि गाळमुक्त धरण या संकल्पना आदी कामे त्यांनी केली आहेत. ‘एक थेंब पाण्याचा’ हा पाणी विषयक माहितीपट, जलसंपदा काल, आज आणि उद्या या संदर्भ ग्रंथाची निर्मिती, नागपुरातील अंबाझरी तलावांचे मजबुतीकरण व सौंदर्यीकरणसाठी लढा आदींसह अनेक उपक्रम त्यांनी चालविले आहेत.