पालकमंत्री बावनकुळे : २ लाख ५० हजार कोटींचे रस्ते होणार नागपूर : येत्या काळात महाराष्ट्र राज्यात २ लाख ५० हजार कोटी रुपयांचे रस्ते निर्मिती करून राज्याला विकासाच्या दिशेने नेण्याचे काम केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा भार ५० टक्के कमी झाला असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर वाबनकुळे यांनी येथे सांगितले.तत्पूर्वी पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, राज्यात ७ हजार किमीचे रस्ते आता २५ हजार कि.मी. पर्यंत तयार करण्यात येणार असून यासाठी निधीची मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे. राज्यरस्ते हे राष्ट्रीय महामार्गात वर्ग करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून राज्यात प्रधान सचिव वने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव यांची एक कमिटी तयार करण्यात येणार असून ही कमिटी त्यावर लक्ष ठेवणार असून जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी या कामावर लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नितीन गडकरी पुढे म्हणाले की, राज्यात तयार होणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांच्या बाजूला राज्य शासनाने मोक्याच्या ठिकाणी ५० ते ६० एकर जमीन उपलब्ध करून दिल्यास राष्ट्रीय महामार्गावर ट्रान्सपोर्ट हब तयार करून त्यात पेट्रोलपंप, गोडाऊन, रेस्टॉरेंट, वाहनांसाठी पार्किंग यासारख्या सुविधांमुळे बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगारांची संधी उपलब्ध होणार आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघाताबाबत चिंता व्यक्त करून हा रस्ता त्वरित करा असे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.(प्रतिनिधी)
राज्यात महामार्गांचे जाळे
By admin | Published: February 20, 2016 3:18 AM