लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सत्र न्यायालयाने क्रीडा घोटाळ्यात आरोपी असलेला महाराष्ट्र राज्य आईस हॉकी संघटनेचा प्रमुख प्रशांत राजाराम चव्हाण याचा जामीन अर्ज गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावला. न्यायाधीश सुनील पाटील यांनी हा निर्णय दिला.
चव्हाणने ८० ते ९० खेळाडूंना आईस हॉकी या खेळाची बनावट प्रमाणपत्रे देऊन लाखो रुपये घेतल्याचा आरोप आहे. तो सांगली जिल्ह्यातील विटा येथील रहिवासी आहे. या प्रकरणात एकूण २३ आरोपी असून त्यापैकी केवळ १२ आरोपींना आतापर्यंत अटक झाली आहे. इतर आरोपी फरार आहेत. या आरोपींविरुद्ध मानकापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. चव्हाणविरुद्ध प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले आहे. हा खटला दीर्घ काळ चालणार असल्यामुळे जामीन देण्यात यावा, असे चव्हाणचे म्हणणे होते. राज्य सरकारने त्याला जामीन देण्यास विरोध केला. चव्हाण हा घोटाळा करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. प्रकरणातील काही आरोपी फरार आहेत. चव्हाणचा त्यांच्यासोबत थेट संपर्क आहे. तसेच, जामीन मिळाल्यास तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो. याशिवाय प्रकरणाचा उर्वरित तपास अद्याप सुरू आहे अशी माहिती सरकारने न्यायालयाला दिली. परिणामी, न्यायालयाने चव्हाणला जामीन देण्यास नकार दिला.