तारिक अन्वर : भारतविरोधी शक्तींना मिळणार बळनागपूर : पाकिस्तान आणि बांगलादेश ही आज दोन स्वतंत्र राष्ट्र आहेत. ही वस्तुस्थिती आहे. अशा वेळी अखंड भारताची गोष्ट करणे चुकीचे आहे. ही गोष्ट करण्याची ही वेळसुद्धा नाही, अशा वक्तव्याने भारतविरोधी शक्तींना बळ मिळेल, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार तारिक अन्वर यांनी येथे व्यक्त केले.खा. अन्वर हे एका कार्यक्रमासाठी नागपुरात आले असता पत्रकार भवनात पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिलेल्या आकस्मिक भेटीमुळे सध्या देशात वादळ उठले आहे. विरोधक त्यांच्यावर टीका करीत आहेत. परंतु तारिक अन्वर यांनी मात्र पंतप्रधानांच्या पाकिस्तान भेटीचे स्वागत केले आहे. मोदी यांची पाकिस्तान भेट ही चांगली सुरुवात आहे. परराष्ट्रीय धोरण हे राजकारणाच्या नजरेतून पाहिले जाऊ नये. पाकिस्तानशी संबंध चांगले राहावेत, यासाठी भारताने पहिल्यांदा पुढाकार घेतला असे नाही. यापूर्वी असे प्रयत्न अनेकदा झाले आहेत. अटलबिहारी वाजपेयी हे बस घेऊन लाहोरला गेले होते. राजीव गांधी अनेकदा पाकिस्तानात जाऊन आले. इंदिरा गांधी यांनीही प्रयत्न केले होते, असेही अन्वर यांनी स्पष्ट केले. यातच भाजपचे ज्येष्ठ नेते राम माधव यांनी पाकिस्तान आणि बांगलादेश यांना मिळून अखंड भारताबाबतचे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावरून सुद्धा देशात वादळे उठले आहे. या वक्तव्याबाबत खा. अन्वर यांना विचारले असता त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. भारत, बांगलादेश आणि पाकिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र आहेत. त्यांचे फेडरेशन होऊ शकले. तसेच सार्क देशांमधील संबंध चांगले राहावेत, एकमेकांच्या देशातील व्यापार, ये-जा सहज सुलभ व्हावी म्हणून नेहमीच प्रयत्न होत असतात. नेपाळमध्ये जायला आपल्याला व्हिजा लागत नाही. तसेच सार्क देशांमध्ये व्हावे, परंतु त्यासाठी तसे संबंध असणे आवश्यक आहे. हे संबंध चांगले राहावेत, यासाठी वारंवार प्रयत्न सुरू असतात, असेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री रमेश बंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुनाफ हकीम, टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, ज्येष्ठ पत्रकार महेश उपदेव उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘अखंड भारत’ चुकीचे वक्तव्य
By admin | Published: December 28, 2015 3:26 AM