नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी पर्वा निमित्त भव्य राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन शनिवार १८ व रविवार १९ नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनाच्या वतीने आयोजित ही स्पर्धा नागपूर जिल्ह्यातील ता. सावनेर येथील दहेगाव (रंगारी) या गावात अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ येथे होणार आहे.
खंजेरी भजन स्पर्धेचा उद्घाटन सोहळा १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे तर मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी, माजी अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय वाटमोडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. बक्षीस व प्रमाणपत्र वितरण रविवार सायंकाळी ५ वाजता होईल. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता १५ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे.