पारशविनी : वेध प्रतिष्ठान नागपूरच्यावतीने महाराष्ट्र दिनी शिक्षकांसाठी ‘राष्ट्रीय अस्मितेचे स्फुल्लिंग छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर राज्यस्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले असून, पुरस्कारही वितरित करण्यात आले. हा कार्यक्रम आभासी पद्धतीने पार पडला.
अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. काशिनाथ मानमोडे हाेते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मनोहर नरांजे होते. या स्पर्धेत विविध भागातून एकूण ६२ निबंध प्राप्त झाले होते. भाषाशैली व भाषिक शुद्धता, विषय ज्ञान, विषय प्रतिपादन, पुराव्यानिष्ठ संदर्भ, सद्यस्थितीतील चिंतनशील प्रासंगिकता या मुद्द्यांच्या आधारे निबंधांचे मूल्यांकन करण्यात आले.
यात भगवंतराव हायस्कूल गोमनी, जिल्हा गडचिरोली येथील आनंद अलोणे यांनी प्रथम, श्री गजानन महाराज महाविद्यालय मुकुटबन, जिल्हा यवतमाळ येथील डॉ. अनंता सूर यांनी द्वितीय आणि एल. ए. डी. कनिष्ठ महाविद्यालय नागपूर येथील डॉ. शुभा साठे यांनी तृतीय पुरस्कार पटकावला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिराळा, जिल्हा उस्मानाबाद येथील डॉ. सतीश शिंदे व विद्या मंदिर बाचनी, जिल्हा कोल्हापूर येथील समीर मुलानी हे प्रोत्साहन पुरस्काराचे मानकरी ठरले. या सर्वांना पुरस्कारापाेटी प्रमाणपत्र व राेख रक्कम प्रदान करण्यात आली. प्रास्ताविक वेधचे सचिव खुशाल कापसे यांनी केले. संचालन स्पर्धा संयोजक कीर्ती पालटकर यांनी केले तर निकाल जाहीर व आभार प्रदर्शन स्पर्धा प्रमुख प्रा. डॉ. अश्विन किनारकर यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी वसंत गोमासे, ओंकार पाटील, राजेंद्र टेकाडे, कमलेश सोनकुसळे, धनंजय पकडे, वैशाली ठाकरे, मारोती मुरके, एकनाथ खजुरिया, घनश्याम भडांगे, वासंती गोमासे यांनी सहकार्य केले.