सुमेध वाघमारे
नागपूर : एन्डोस्कोपिक पद्धतीने लहान आतड्यात प्रवेश करणे कठीण असते. यातच आतड्याची लांबी मोठी असल्याने तपासण्यात २ तासांपेक्षा अधिक वेळ लागायचा. परंतु आता ‘मोटाराइज्ड स्पायरल एन्टरोस्कोपी’ नावाच्या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे मिडास रुग्णालयातील डॉक्टरांनी केवळ १८ मिनिटांत संपूर्ण २० फूट लहान आतडीची तपासणी केली. हे तंत्रज्ञान आतड्यांच्या आजारांत वरदान ठरतेय.
मध्यभारतातील या पहिल्या तंत्रज्ञानाचा उपयोग मिडास रुग्णालयातील कुशल डॉक्टरांच्या मदतीने चार रुग्णांवर यशस्वी करण्यात आला. या तंत्रज्ञानामुळे आजाराचे अचूक निदान व उपचारांचे नियोजन करणे शक्य झाले. मिडास येथील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट कन्सलटंट डॉ. श्रीकांत मुकेवार यांनी सांगितले, पूर्वीच्या एंडोस्कोपने इतक्या कमी वेळात संपूर्ण लहान आतडीची तपासणी करणे शक्य नव्हते. ‘मोटाराइज्ड स्पायरल एन्टरोस्कोपी’ ही मध्य भारतातील पहिली प्रक्रिया आहे. यामुळे ‘गॅस्ट्रोइंटेस्टाइनल’ स्थितींचे निदान आणि उपचार अधिक अचूकतेने आणि कार्यक्षमतेने करण्यास मदत होते. या उपचार पद्धतीमुळे मिडास रुग्णालयातील चार रुग्णांमधील आतड्याच्या आतील रक्तस्त्राव, दाह, आंकुचन आणि कर्करोगाचे निदान करणे शक्य झाले. मुंबई येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे डॉ. श्रीधर सुंदरम व मिडास हॉस्पिटलचे डॉ. सौरभ मुकेवार यांनी ही प्रक्रिया केली.