डॉ. बाबासाहेबांनी स्वतः केलेले धर्मांतर आणि त्यांनी दलितांना दिलेली दीक्षा ही रूढ अर्थाने केवळ धार्मिक अदलाबदल नव्हती. आपण केलेल्या कार्याचा परिणाम म्हणून दलितांना नंतरच्या काळात समृद्धीचे दिवस येणार आहेत; मात्र त्यांनी समृद्ध जीवनाचा मार्ग कसा, याचे डॉ. बाबासाहेबांनी केलेले दिशादिग्दर्शन म्हणजे त्यांनी दिलेली ही धम्मदीक्षा होय. धर्मांतराच्या घटनेला आता ६५ वर्षे होऊन गेलीत. स्वातंत्र्य मिळूनही आपण ७६ वर्षे पूर्ण केली आहेत. आपल्या समाजाची मंडळी प्रत्यक्षात एकत्र येणे तसे महाकठीण. वास्तविक त्यांनी एकत्र यावे आणि एकत्र काम करावे, अशी आपल्या सगळ्यांची मनापासून इच्छा आहे. त्यांनी ती मान्य केल्यास महाराष्ट्राचे चित्रच पालटू शकते; पण ते पालटू शकणार नाही, कारण मंडळी एकत्र येणार नाहीत, अशी स्थिती आहे. या हताश स्थितीतही मात्र आशेचा किरण आहे. हिंदू धर्माचा त्याग करून बुद्धधम्मात जाणे ही डॉ. बाबासाहेबांची केवळ प्रतिक्रियात्मक भूमिका नव्हती, त्यामागे त्यांचा ठोस सकारात्मक तात्विक दृष्टिकोन होता. १६३६ साली जात निर्मूलन या जातपात तोडक मंडळासाठी तयार केलेल्या ऐतिहासिक भाषणात डॉ. आंबेडकरांनी समाज परिवर्तनाच्या संदर्भात हा सकारात्मक विचार मांडलेला आहे. त्यांचे म्हणणे असे की, कोणत्याही राजकीय क्रांतीच्या अगोदर सामाजिक सुधारणा आणि प्रबोधनाची चळवळ झाल्याचे इतिहासातील दाखले आहेत. उदा. चंद्रगुप्त मौर्याचे साम्राज्य प्रस्थापित होण्यापूर्वी बुद्धांच्या समतावादी तत्त्वाचा उदय आणि विकास झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य स्थापण्यापूर्वी संतांची चळवळ झाली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दुसरी महत्त्वाची भूमिका अशी की, समाजव्यवस्थेला एक नैतिक अधिष्ठान व आचारसंहिता लागते. त्यांच्या आधारे समाजाचे व्यवहार चालावेत, अशी अपेक्षा असते. डॉ. बाबासाहेबांना आजच्या काळात सुसंगत अशी नैतिक आचारसंहिता फक्त बुद्धांच्या तत्त्वज्ञानात असल्याची खात्री झाल्यामुळे त्यांनी बुद्ध धम्माचा पर्याय स्वीकारला. धर्मांतरामुळे देशात समाज परिवर्तनाचे एक नवे चक्र सुरू झाले आणि मानसिक, सामाजिक आणि सांस्कृतिक या तिन्ही क्षेत्रात धर्मांतराचे दृष्य परिणाम आपण आज पाहत आहोत.
भारतीय समाजव्यवस्थाच समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित निर्माण करण्यासाठी बुद्धाचेच तत्त्वज्ञान सुसंगत आहे, ही डॉ. आंबेडकरांची धर्मांतरामागील व्यापक प्रेरणा लक्षात घेतली, तर देशाचे आजचे नेमके चित्र कसे आहे, याचाही आपल्याला अंतर्मुख होऊन विचार करावा लागेल. धर्मांतराच्या घटनेला ६५ वर्षे लोटल्यानंतर आज या सगळ्या घडामोडीचे मूल्यामापन कसे करायचे, हा खरा प्रश्न आहे. धर्म विचारात आणि बुद्ध धम्माविषयीच्या चिंतनात आंबेडकरांनी घातलेली भर ही धर्मांतर चळवळीची एक महत्त्वाची निष्पत्ती आहे; पण गेल्या ६५ वर्षात एकूण समाजाचे या तत्त्वचिंतनाकडे फारसे लक्ष गेले नाही. ऐहिक जीवनाचा तात्विक पाया रचणारे तत्त्वज्ञान असे जर बाबासाहेबांच्या धम्मविचारांचे केंद्र मानले तर खुद बाबासाहेबांच्या अनुयायांना हा विचार फारसा पुढे नेता आला नाही. ऐहिक आणि मानसिक गुलामगिरीपासून मुक्तता मिळवणे हा बाबासाहेबांनी मुक्तीचा अर्थ सांगितला; पण बुद्धधम्म उत्तरोत्तर जास्तच कर्मकांड यात अडकून पडत गेला. परकीय भिक्खूंचा वावर आणि प्रभाव वाढला आणि आंबेडकरप्रणित मुक्तीचा प्रवास दुर्लक्षित करण्यात आला.
धर्मांतर चळवळीच्या मूल्यमापनाचा दुसरा मुद्दा संख्यात्मक असू शकतो. महाराष्ट्रातील एकूण दलितांपैकी निम्मे बौद्ध बनले ( २०११ च्या जणगणनेनुसार ६६ टक्के) पण महाराष्ट्राबाहेर मात्र हे प्रमाण फार मर्यादित राहिले. भारतात आजमितीला एकूण लोकसंख्येत बौद्धांचे प्रमाण एक टक्क्याहून कमी आहे. त्यापैकी ज्या राज्यामध्ये पूर्वापार बौद्ध आहेत, त्यांची संख्या एकूण बौद्धांच्या ढोबळमानाने आठ टक्क्यांच्या आसपास भरते. उरलेले सर्व बौद्ध हे धर्मांतरित आहेत, असे मानले तरी महाराष्ट्रातील
बौद्ध भारतातल्या एकूण बौद्धांच्या ७३ टक्के भरतात. जातिव्यवस्थेचा दुर्दैवी प्रभाव असा की खुद्द महाराष्ट्रातही सर्व अस्पृश्य जातींनी धर्मांतराचा निर्णय स्वीकारला नाही. आता अलिकडे ओबीसी आणि भटक्या विमुक्तांमध्ये धर्मांतराचा विचार बिंबविण्याचे प्रयत्न होत आहेत. हा अपवाद वगळला तर दलित्तेतर हिंदूंनी धर्मांतराच्या किंवा बुद्ध धम्म विचाराच्या पर्यायाकडे गंभीर होऊन पाहिलेलेच नाही, असे दिसते. सारा भारत बुद्धमय करण्याची डॉ. बाबासाहेबांची आकांक्षा होती. ती पूर्ण झालेली नाही; पण समतावादी राजकारणाचा भारतातला एक मोठा हिस्सा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बुद्धमय झाला आहे, ही वाटचाल दृष्टीआड करण्यासारखी नक्कीच नाही.
- एल. टी. लवात्रे,
निवृत्त उप-महाप्रबंधक वेकाेलि,
बैरामजी टाऊन, चिटणीस ले-आऊट, नागपूर.