नागपूर : स्टेट ट्रान्सपोर्ट को-आॅप बँकेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) चे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी पत्रपरिषदेत केला. या बँकेची येत्या २७ मे रोजी निवडणूक होत आहे. इंटकप्रणित क्रांती पॅनल ही निवडणूक लढवित आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी छाजेड महामंडळाच्या सर्व आगारामध्ये कर्मचाऱ्यांच्या भेटी घेत आहे. नागपूर आगाराची बैठक त्यांच्या अध्यक्षतेत शुक्रवारी घेण्यात आली. यावेळी बोलताना छाजेड म्हणाले की, बँकेचा गैरप्रकार झाकण्यासाठी, सामान्य कर्मचाऱ्यांना बँकेची निवडणूक लढविण्यात येऊ नये म्हणून पहिल्यांदा राज्यस्तरीय मतदार संघ तयार केला आहे. सध्या बँक कामगार संघटनेच्या ताब्यात आहे. कोअर बँकिंगच्या नावाखाली बँकेने २५ कोटी खर्च केले आहे. मात्र ही प्रणाली सध्या काम करीत नाही. त्याची चौकशी सुरू आहे. कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण व महासचिव हनुमंत ताटे यांनी बँकेत गैरमार्गाने नातेवाईकांना नोकरीस लावले आहे. बँकेने परराज्यात १५६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. संगणक घोटाळा, परराज्यात गुंतवणूक, सदोष नोकरभरती आदी बाबतीत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी इंटकने केली आहे. इंटकने होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रचाराचा शुभारंभ केला आहे. इंटकप्रणित कामगार क्रांती संघटनेने ६७ आगारांना भेटी देऊन, कर्मचाऱ्यांसोबत बैठकी केल्या आहे. (प्रतिनिधी)
स्टेट ट्रान्सपोर्ट को-आॅप बँकेत गैरप्रकार
By admin | Published: May 09, 2015 2:27 AM