भिवापूर : महालगाव येथील प्रकरणात मुख्याध्यापक व शिक्षकांचा कुठलाही प्रत्यक्ष सहभाग नसताना त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे तत्काळ मागे घ्यावे, अशी मागणी शिक्षक समन्वय कृती समितीने केली आहे. याबाबत शिक्षक भारतीने पोलीस अधीक्षकांना, तर शिक्षक कृती समन्वय समितीने शिक्षण विभागाला सोमवारी निवेदन दिले.
महालगावप्रकरणी बेला पोलीस स्टेशनमध्ये शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक व स्वयंसेविका तरुणी अशा तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. याप्रकरणाशी शिक्षकांचा कुठलाही प्रत्यक्ष संबंध नसताना त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे अन्यायकारक असल्याची बाब शिक्षक संघटनांनी प्रशासनापुढे मांडली. याबाबत शिक्षक भारतीने नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी,अध्यक्ष व शिक्षण सभापतींना निवेदन दिले. शिवाय याप्रकरणी न्याय मिळविण्यासाठी शिक्षकांच्या सर्व संघटनांनी एकत्रित येत शिक्षक कृती समन्वय समितीदेखील गठित केली. या समितीने खंडविकास अधिकारी माणिक हिमाने व गटशिक्षणाधिकारी (प्रभारी) विजय कोकोडे यांना निवेदन सादर केले. महालगावप्रकरणी शिक्षकांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. यावेळी शिक्षक कृती समितीचे आनंद गिरडकर, दिलीप जिभकाटे, संदीप जुआरे, अभय बुध्दे, अशोक तोंडे, अनिल राठोड, सुनील चावके, प्र. शा. देशमुख, अंकुश मेश्राम आदी उपस्थित होते. पोलीस अधीक्षकांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात महेंद्र बनसिंगे, प्रवीण फाळके, नरेश पन्नासे आदींचा समावेश होता.
260721\2033-img-20210726-wa0107.jpg
पोलीस अधिक्षकांना निवेदन देतांना शिक्षक संघटनेचे पदाधिकारी