नागपूर : राज्यात सध्या सुरू असलेल्या ॲडव्हेंचर टुरिझम(साहसिक पर्यटन)मध्ये एकसूत्रता आणण्यासाठी लवकरच राज्याचे साहसिक पर्यटन धोरण जाहीर होत आहे. पर्यटन संचालनालयाकडून यासाठी हालचाली सुरू असून कच्चा मसुदाही तयार झाला आहे.
राज्यात सध्या अनेक ठिकाणी ॲडव्हेंचर टुरिझम सुरू आहे. त्यासंदर्भात पर्यटन विभागाचे निश्चित धोरण नसल्याने त्यात नियमितता नाही. साहसिक खेळ, वॉटर पार्क, ट्रॅकिंग आदीसह अनेक प्रकाराचा यात समावेश आहे.
महाराष्ट्र हे देशातील श्रीमंत आणि विकसित राज्यांपैकी एक आहे. येथे अनेक पर्यटन स्थळे, गर्दी खेचणारी धार्मिक स्थळे, अनेक राष्ट्रीय उद्याने, पक्षी अभयारण्ये तसेच पॅराग्लायडिंग, स्कूबा ड्रायव्हिंग आणि काही ठिकाणी ट्रेकिंग डेस्टिनेशन्ससारखे मनोरंजनात्मक उपक्रम आहेत. कॅम्पिंग, पर्वतारोहण, जंगली गुहा मोहीम, व्हॅली क्रॉसिंग, झिपलाईन उपक्रम, बंजी जम्पिंग, रॉक क्लायबिंग ॲक्टिव्हिटीज, बर्डवॉचिंग आणि फोटोग्राफी यांचाही यात समावेश आहे. या सर्वांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी हे धोरण असेल.
...
कृषी, वन पर्यटनातही घ्यावी लागणार परवानगी
राज्यात कृषी आाणि वन पर्यटनातही यापुढे पर्यटन संचालनालयाकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. ॲडव्हेंचर टुरिझममध्ये सुमारे १०० उपक्रमांचा समावेश आहे. पर्यटनादरम्यान दुर्घटना घडल्यास जबाबदारी निश्चित करता यावी यासाठी नियम, अटी, सुरक्षेचे नॉर्म ठरणार आहेत. यातून सरकारला नियमित महसूल मिळणे, हा सुद्धा हेतू आहे. या परवानगीसाठी राज्य, विभाग व जिल्हास्तरावर शासकीय कमिट्या गठित होणार आहेत.
दोन आठवड्यात अधिसूचना निघणार?
त्यासाठी नवे धोरण ठरविणे सुरू आहे. कच्चा मसुदा तयार करून पर्यटन संचालनालयाने प्रसिद्ध केला होता. त्यावर तज्ज्ञांच्या सूचनाही मागविल्या होत्या. सर्व प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून येत्या दोन आठवड्यात अधिसूचना निघण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
...