ब्रॅन्डीज युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीत होणार स्थापना : प्रज्ञा मूर्ती यांनी तयार केला पुतळानागपूर : नागपुरात तयार करण्यात आलेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अमेरिकेच्या ‘ब्रॅन्डीज युनिव्हर्सिटीच्या गोल्डफर्ब लायब्ररी’त बसविण्यात येणार आहे. नागपूरचे प्रसिद्ध शिल्पकार प्रज्ञा मूर्ती यांनी हा पुतळा तयार केला आहे. नागपुरातून अमेरिकेत जाणारा बाबासाहेबांचा हा पहिला पुतळा आहे.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती भारतासह जगात साजरी होत आहे. याच निमित्ताने अमेरिकेच्या ‘ब्रॅन्डीज युनिव्हर्सिटीच्या गोल्डफर्ब लायब्ररी’त बाबासाहेबांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. हा पुतळा हुबेहुब बाबासाहेबांसारखा असावा, यासाठी एका चमूने बऱ्याच मूर्तिकारांशी संपर्क साधला होता. अखेर नागपुरातील प्रसिद्ध शिल्पकार प्रज्ञा मूर्ती यांच्याकडे हे काम सोपविण्यात आले. दोन फूट उंच व ब्राँझचा असलेला हा पुतळा तयार करण्यास मूर्ती यांना दीड महिन्याचा कालावधी लागला. हुबेहुब बाबासाहेबांची मूर्ती तयार झाल्यानंतर जेव्हा पुन्हा ही चमू आली तेव्हा त्यांनी पुतळा पाहून आश्चर्य व्यक्त केले. मनासारखे काम झाल्याने त्यांनी मूर्ती यांचे कौतुक केले. ‘लोकमत’शी बोलताना मूर्ती म्हणाले, नागपूरवरून हा पुतळा अमेरिकेत जाणार असल्याने व तेथील लोकांना बाबासाहेबांची थोरवी, त्यांची विद्वत्ता आणि त्यांच्या महान कार्याची प्रेरणा मिळणार असल्याने हा पुतळा अधिक आकर्षक व हुबेहुब करण्यासाठी बरचे परिश्रम घेतले. पुतळ्यातील बाबासाहेबांच्या ‘टाय’ व ‘ड्रेस’ला वेगळे ‘स्ट्रक्चर’ केले. अर्धाकृती आकारात असलेला हा पुतळा तयार झाल्यानंतर आंबेडकरी चळवळीतील काही वरिष्ठ व्यक्तीही हा पुतळा पाहण्यासाठी आले होते. त्यांनी झालेल्या कार्याचे कौतुक केले. हा पुतळा ८ एप्रिल रोजी विमानाने हैदराबादमार्गे अमेरिकेत गेला आहे. तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त २९ एप्रिल रोजी या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. असे म्हणत मूर्ती यांनी आपल्या मनातील खंतही व्यक्त केली. ते म्हणाले, संयुक्त राष्ट्रसंघात डॉ. बाबासाहेबांची जयंती साजरी होत आहे. असे असले तरी एक वेदना माझ्या मनात आहे! डॉ. बाबासाहेबांनी आम्हा सबंध भारतीयांच्या हितासाठी महान कार्य केले आहे; मात्र त्यांच्या जयंती कार्यक्रमात समग्र भारतीयांचा अजून सक्रिय सहभाग नाही, ही वेदनादायक बाब आहे. असे का घडले जात आहे? याचा या १२६ व्या जयंतीनिमित्ताने आम्हा सबंध भारतीयांनी विचार करणे गरजेचे आहे.(प्रतिनिधी)
नागपुरातील बाबासाहेबांचा पुतळा अमेरिकेत
By admin | Published: April 12, 2017 1:42 AM