लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे. लोकराजा प्रजाहितदक्ष, वंचित, उपेक्षित, बहुजनांचा हितकर्ता म्हणून छत्रपती शाहू महाराज यांचा गौरव केला जातो. सामाजिक सुधारणा, समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी सर्वस्व पणाला लावणारा कृतीशील राजा म्हणून त्यांचे कार्य अजरामर आहे. लोकराजा शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा महापालिकेच्यावतीने नागपूर शहरात उभारण्यात यावा, अशी मागणी पीपल्स रिलब्लिक पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे व कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने गुरुवारी महापौर दयाशंकर तिवारी यांना दिलेल्या निवेदनातून केली.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज पूर्णाकृती पुतळा समिती निर्माण करण्यात आली. यात सर्वपक्षीय सदस्यांचा समावेश राहणार आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला. यासाठी जागा सूचवावी. ती जागा प्रदान केली जाईल. तसेच यासाठी महाराष्ट्र शासनाकडे शिफारस करून नागरी विभागाकडून मंजुरी मिळण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही महापौरांनी दिल्याची माहिती जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकारांना दिली.
शिष्टमंडळात पक्षाचे शहराध्यक्ष अरूण गजभिये, जिल्हाध्यक्ष नरेंद्र डोंगरे, कपिल लिंगायत, अजय चव्हाण, बाळुमामा कोसणकर, कैलास बोंबले, तुषार चिकाटे, दिलीप पाटील, रवी बाणमारे,भगवान भोजवाणी, भीमराव कळमकर, विपीन गाडगीलवार, संजय नरोंदेकर, मिलींद गवळी आदींचा समावेश होता.