नागपूर : भारत जोडो यात्रेमुळे राज्यातील वातावरण बदलून गेले आहे. लोकांना काँग्रेस परत हवी आहे. लोक तुमची वाट पाहत आहेत. राज्यात स्वबळावर काँग्रेसची सत्ता येईल, असे वातावरण आहे, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी केला.
प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक राणी कोठी येथे पार पडली. बैठकीला ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानाचे महाराष्ट्र प्रमुख माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार, तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे, खासदार बाळू धानोरकर, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, आरीफ नसीम खान, सुनील केदार, सुनील देशमुख, सतीश चतुर्वेदी, आमदार विकास ठाकरे, प्रणिती शिंदे, अभिजित वंजारी, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, प्रवक्ते अतुल लोंढे, अतुल कोटेचा, विशाल मुत्तेमवार आदी उपस्थित होते.
या बैठकीत प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेश नव्हता. त्यामुळे नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी मनमोकळेपणाने मते मांडली.
पटोले म्हणाले, आम्ही लोकं सांभाळण्यात कमी पडलो. त्यामुळे एकामागून एक लोक पक्ष सोडून गेले. एक गेला की आपले जमते, ही मानसिकता आता बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
पक्ष सोडणारे पवारच म्हणतात, काँग्रेस कुणी संपवू शकत नाही!
- राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी १९९९ साली काँग्रेस पक्ष सोडत राष्ट्रवादीची स्थापना केली. नुकतेच काँग्रेसच्या स्थापना दिवशी काँग्रेसच्या निमंत्रणावरून पवार हे काँग्रेसच्या पुण्यातील कार्यालयात गेले. त्यावेळी त्यांनीच काँग्रेस कुणीही संपवू शकत नाही, असे वक्तव्य केले, असे उदाहरण देत पटोले यांनी अप्रत्यक्षपणे पवारांना टोला लगावला.
नवी मुंबई, ठाण्यावर लक्ष द्या
- कोकण, मराठवाड्यासह सोलापूर व नाशिक परिसरातही काँग्रेसची स्थिती सुधारली आहे. मात्र, नवी मुंबई, पालघर, ठाणे या परिसरात पक्षाचे मोठमोठे नेते असूनही परिस्थिती फारशी बदललेली नाही, अशी खंत व्यक्त करीत या भागावर अधिक लक्ष देण्याची सूचना पटोले यांनी केली.
बैठकीत गैरहजर राहणारे माजी मंत्री व पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठविणार
- बैठकीला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर आले नाहीत. पटोले म्हणाले, प्रदेश कार्यकारिणी मोठी आहे. पण अनेक जण बैठकीलाच येत नाहीत. माजी मंत्री के. सी. पाडवी हे तर कधीच आले नाहीत. पक्षाला मानायचेच नाही, ही व्यवस्था आता बदलावी लागेल. आजच्या बैठकीला काही माजी मंत्री येऊ शकले नाहीत, त्यांनी कारण कळविले आहे. पण जे कारण न कळविता अनुपस्थित आहेत त्यांना नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागविले जाईल, असा इशाराही पटोले यांनी दिला.
वडेट्टीवार म्हणाले, मी भाजपात जाणार नाही
- माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पक्षांतर्गत विरोधकांना कानपिचक्या दिल्या. ते म्हणाले, आपलेच लोक वडेट्टीवार भाजपात जाणार अशा चर्चा हेतूपुरस्सर पसरवित आहेत. मी कुणालाही भेटलो नाही. मी भाजपात जाणार नाही, असे वडेट्टीवार यांनी ठासून सांगितले.