अधिसूचना जारी : ७५६.५९ हेक्टर क्षेत्र लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य शासनाने नागपूर शेजारच्या अंबाझरी जंगलाला राखीव वनाचा दर्जा प्रदान केला आहे. यासंबंधी अलीकडेच एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नागपूर ग्रामीण व हिंगणा तालुक्यात विस्तारलेल्या या जंगलाचे एकूण ७५६.५९ हेक्टर क्षेत्र आहे. जाणकारांच्या मते, मागील काही वर्षांपूर्वी महसूल विभागाने बावनथडी व कलेसराय प्रकल्पासाठी वन विभागाकडून राखीव क्षेत्रातील काही जंगल घेतले होते. त्यामोबदल्यात वन विभागाला अंबाझरी येथील ७५६.५९ हेक्टर जमीन देण्यात आली होती. त्यासंबंधी सुरुवातीला सेक्शन ४ नुसार अधिसूचना जारी केली होती. परंतु ती तात्पुरत्या स्वरूपाची होती. त्यामुळे आता सेक्शन २० अन्वये दुसरी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेसोबतच अंबाझरीवर राखीव वन म्हणून शिक्कामोर्तब झाले आहे. या क्षेत्राला राखीव वनाचा दर्जा मिळताच आता येथे फॉरेस्ट कन्झर्व्हेशन अॅक्ट लागू झाला आहे. यामुळे आता येथील क्षेत्रात कोणतेही वनेतर काम करण्यापूर्वी त्याला केंद्र शासनाची मंजुरी घ्यावी लागणार आहे. शहरातील वन्यप्रेमी आणि पक्षिप्रेमी शासनाच्या या अधिसूचनेवर आनंद व्यक्त करीत आहे. या निर्णयाने या जंगलाच्या संरक्षणाला बळ मिळणार आहे; शिवाय येथील नैसर्गिक सौदर्य आणि जैवविविधता टिकविण्यास मदत मिळणार आहे.
अंबाझरीला राखीव वनाचा दर्जा
By admin | Published: July 05, 2017 2:11 AM