लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण हाच सर्वाेत्तम पर्याय आहे. सध्या दोन कोरोना प्रतिबंधक लसी उपलब्ध आहेत. परंतु दोन्ही लसीच्या तुटवड्यामुळे लाभार्थी अडचणीत आले आहे. यामुळे पहिला डोस एका लसीचा आणि दुसरा डोस दुसऱ्या लसीचा म्हणजे, ‘कॉकटेल’ लसीकरणाचा विचार होऊ लागला आहे. परंतु कॉकटेल लसीकरणावर अद्याप संशोधन झाले नसल्याने तूर्तासतरी त्यापासून दूर राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. नागपूर जिल्ह्यात अद्यापतरी कुणाला चुकून दुसरी लस देण्यात आली नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक यांचे म्हणणे आहे.
कोरोना प्रादुभार्वाला रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड व भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन या दोन लसी दिल्या जात आहेत. दरम्यानच्या काळात १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली होती. परंतु लसीच्या तुटवड्यामुळे तूर्तासतरी ती बंद आहे. शिवाय, ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरणही अडचणीत आले आहे. यामुळे ‘कॉकटेल’ लसीकरणाविषयी जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थनगर जिल्ह्यात पहिला डोस कोविशिल्डचा, तर दुसरा डोस कोव्हॅक्सीनचा चूक न दिल्याची घटना घडल्याने दोषींवर कारवाई झाली आहे. अमेरिकेतील एका संशोधनानुसार दोन अग्रगण्य कोविड लसींचे डोस मिसळल्याने काही जणांना थकवा आणि डोकेदुखी यासारख्या ‘साइड इफेक्ट’ दिसून आले आहे. प्राथमिक अभ्यासातील ही निरीक्षण असलेतरी याबाबत अंतिम निष्कर्षसमोर आलेला नाही.
-कॉकटेल लसीमुळे किती बचाव हे अद्याप अस्पष्ट
पहिला डोस एका लसीचा, तर दुसर डोस दुसऱ्या लसीचा घेतल्यास म्हणजे ‘कॉकटेल’ लसीमुळे विषाणूंपासून किती बचाव होईल अद्याप स्पष्ट झाले नाही. यावर आपल्याकडे संशोधनही झाले नाही. यामुळे तुटवडा आहे म्हणून ‘कॉकटेल लस’ घेऊ नये किंवा ती देऊ सुद्धा नये.
-डॉ. निर्मल जयस्वाल, फिजिशियन
-क्लिनिकल चाचणी नाही, यामुळे घेऊ नये
भारतात दोन प्रमुख लसींपैकी एक ‘डेड’कोरोना व्हायरसने बनलेली आहे, तर दुसरी ‘वेक्टर’ लस आहे. शेवटी दोन्हीमध्ये अँटिजन तयार केले जात असलेतरी हे वेगवेगळ्या प्रक्रियांच्या माध्यमातून घडते. दोन वेगवेगळ्या लस घेण्यावर क्लिनिकल चाचणी झालेली नाही. त्याचे निष्कर्ष समोर आलेले नाही. या दोन्ही लसी आप्तकालीन स्थितीत दिल्या जात आहेत. यामुळे लसीच्या ‘कॉकटेल’पासून दूर राहणेच बरे.
-डॉ. सुशांत मेश्राम, श्वसनरोग तज्ज्ञ
-नागपुरात लसीचे कॉकटेल नाही
नागपूर जिल्ह्यात कॉकटेल लसीचे एकही प्रकरण नाही, किंवा कुणाची तक्रार नाही. आरोग्य विभागाकडूनही या संदर्भात कोणत्याही सूचना नाहीत. आपल्याकडे कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीच्या उपलब्धतेनुसार दिली जात आहे. यामुळे लाभार्थ्यांनी पहिली जी लस घेतली तीच लस घ्यावी
-डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा शल्यचिकित्सक नागपूर