लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आजच्या मुलांमध्ये सोशल मीडियाची प्रचंड क्रेज वाढली आहे. सोशल मीडिया जणू त्यांचे विश्वच झाले आहे. पण जेईई अॅडव्हान्समध्ये अखिल भारतीय स्तरावर प्रथम आलेला कार्तिकेय गुप्ता हा फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटरसारख्या सोशल मीडियापासून दूर आहे. इतकेच काय तर त्याने स्मार्ट फोनसुद्धा वापरला नाही. आपण ठरविलेले ध्येय, लक्ष्य गाठायचे असेल तर सोशल मीडियापासून दूर राहा, असा सल्ला त्याने आजच्या विद्यार्थ्यांना दिला आहे. कार्तिकेयने सोमवारी लोकमत भवनात भेट दिली. यावेळी त्याचे वडील चंद्रेश गुप्ता, आई पूनम गुप्ता व भाऊ रक्षितही होते. लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांनी कार्तिकेयला पुष्पगुच्छ देऊन त्याचे व संपूर्ण गुप्ता कुटुंबाचे अभिनंदन केले. यावेळी कार्तिकेयला त्यांनी विनोबा दर्शन ही पुस्तकही भेट दिली. प्रसंगी चर्चेत कार्तिकेय स्वत:बद्दल सांगताना म्हणाला की, आयटी इंजीनिअर बनण्याचे स्वप्न मी बाळगले होते. त्यासाठी देशातल्या टॉप असलेल्या आयआयटी पवईमध्ये मला प्रवेश मिळवायचा होता. हे लक्ष्य गाठण्यासाठी माझ्यापुढे अभ्यास हा एकमेव पर्याय होता. त्यासाठी सतत ५ ते ६ तास अभ्यास केला. परफॉर्मन्स सुधारण्यासाठी साप्ताहिक चाचण्या दिल्या. अभ्यासात आलेल्या अडचणी, शंका इंटरनेटवर न शोधता पुस्तकांतून त्या सोडविल्या. शंकांचे निरसन झाल्याशिवाय मला झोप येत नव्हती. मी या दोन वर्षात केवळ अभ्यासावर प्रेम केले. त्यामुळे मला कंटाळा जाणवलाच नाही.अभ्यास इतका झाला होता की आयआयटी पवईमध्ये माझी निवड होईल, याची खात्री होती. पण देशातून प्रथम येईल, असे वाटले नाही. कार्तिकेय म्हणाला की, माझ्या यशामध्ये आई-वडिलांचा मोठा वाटा आहे. आयआयटीसाठी लावलेल्या कोचिंगमुळे सुद्धा बराच फायदा झाला. मी कधीच नकारात्मक विचार केला नाही.कधीही अभ्यासासाठी दबाव आणला नाहीकार्तिकेयची गुणवत्ता आम्हाला दहावीतच कळली होती. त्याच्यात अभ्यासाची गोडी होती. त्यामुळे आम्हाला अभ्यासासाठी दबाव आणावा लागला नाही. तो इतका समजदार आहे की, आम्ही त्याला स्मार्ट फोन घेऊन दिला. पण अभ्यासात त्रास होतो म्हणून आठवड्याभरात त्याने परत केला. मुलांची गुणवत्ता त्यांच्या आचरणावरून कळते आणि कार्तिकेय अतिशय संस्कारी आणि विनम्र असल्याची भावना आई पूनम व वडील चंद्रेश गुप्ता यांनी व्यक्त केली.तू ग्लोबल प्रॉपर्टी आहेयावेळी कार्तिकेयला शुभेच्छा देताना विजय दर्डा म्हणाले की, कार्तिकेय तू ग्लोबल प्रॉपर्टी आहे. मी तुझ्याकडे ग्लोबल लीडर म्हणून बघतो आहे. तू करिअर घडविताना जगात, देशात प्रेम, बंधुभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. त्यांनी कार्तिकेयला तुझ्या यशात आई-वडिलांचे महत्त्वाचे योगदान असल्याचे सांगत, मोठा होऊन आई-वडिलांची सेवा कर, हीच ईश्वर सेवा असल्याचेही ते म्हणाले. सोबतच त्यांनी कार्तिकेयला चांगल्या वाईटांची ओळख शिक. जीवनात मित्र आवश्यक आहे. त्यामुळे चांगल्या मित्राची संगत ठेवण्याचा सल्ला दिला. तुझ्यासारखे विद्यार्थी जेव्हा देशात नाव कमवितात, मोठे करिअर करतात, तेव्हा त्यांनी सामाजिक दायित्व बाळगून गरीब मुलांच्या अभ्यासात, त्यांच्या करिअरमध्येसुद्धा मदत करावी, अशी अपेक्षाही दर्डा यांनी व्यक्त केली.