सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास मनाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 06:57 PM2017-12-21T18:57:46+5:302017-12-21T18:59:54+5:30
सहायक मोटर वाहन निरीक्षकांची राज्यभरातील ८३३ पदे भरण्यासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल पुढील आदेशापर्यंत जाहीर करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मनाई केली आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : सहायक मोटर वाहन निरीक्षकांची राज्यभरातील ८३३ पदे भरण्यासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल पुढील आदेशापर्यंत जाहीर करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मनाई केली आहे.
ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आली आहे. या पदभरतीत ५ टक्के जागा खेळाडूंकरिता राखीव आहेत. परंतु परीक्षेकरिता आॅनलाईन अर्ज मागवताना क्रीडा प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य करण्यात आले नाही. त्यामुळे १ जुलै २०१६ रोजीच्या ‘जीआर’मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचा दावा करून राज्यस्तरीय रस्सीखेचपटू अजितपालसिंग खालसा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यापूर्वी त्यांनी या पदभरती प्रक्रियेविरुद्ध महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात अर्ज दाखल केला होता. न्यायाधिकरणने त्यांना संबंधित अर्ज दाखल करण्याचा अधिकार नसल्याचे कारण देऊन अर्ज खारीज केला. परिणामी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता पुढील आदेशापर्यंत परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास मनाई करून शासनाला याचिकाकर्त्याच्या तक्रारीवर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. प्रतीक मेहता व अॅड. आकाश तिवारी यांनी कामकाज पाहिले.