राज्यस्तरीय नर्सिंग परीक्षेवर स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:29 AM2018-07-21T00:29:40+5:302018-07-21T00:31:18+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी काही विद्यार्थिनींच्या याचिकेची गंभीर दखल घेऊन राज्यस्तरीय आॅक्सिलियरी नर्सिंग मिडवायफरी (एएनएम) व जनरल नर्सिंग अॅन्ड मिडवायफरी (जीएनएम) परीक्षेवर अंतरिम स्थगिती दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी काही विद्यार्थिनींच्या याचिकेची गंभीर दखल घेऊन राज्यस्तरीय आॅक्सिलियरी नर्सिंग मिडवायफरी (एएनएम) व जनरल नर्सिंग अॅन्ड मिडवायफरी (जीएनएम) परीक्षेवर अंतरिम स्थगिती दिली.
ही परीक्षा स्टेट बोर्ड आॅफ नर्सिंग अॅन्ड पॅरामेडिकल एज्युकेशनद्वारे २४ जुलै रोजी घेण्यात येणार होती. बोर्डला ही परीक्षा घेण्याचा कायदेशीर अधिकार नसल्याचा दावा काही विद्यार्थिनींनी केला आहे. त्यात प्रथमदर्शनी तथ्य आढळून आल्यामुळे न्यायालयाने परीक्षेवर अंतरिम स्थगिती दिली. तसेच, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिवांना नोटीस बजावून बोर्डाला ही परीक्षा घेण्याचा अधिकार कोणी दिला अशी विचारणा केली व याचिकाकर्त्यांच्या तक्रारीवर तीन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला.
इंडियन नर्सिंग कौन्सिलने बोर्डाला ही परीक्षा घेण्याची मान्यता दिली नाही असे सुनावणीदरम्यान न्यायालयाला सांगण्यात आले. यासंदर्भात ‘एएनएम’च्या तीन व ‘जीएनएम’च्या तीन अशा एकूण सहा विद्यार्थिनींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. आनंद परचुरे यांनी बाजू मांडली.