सुरक्षेवर प्रश्नचिन्ह : वर्षभरातील दुसरी घटना नागपूर : उपराजधानीच्या मध्यभागी असलेल्या महाराज बागेतील सहा चंदनाची झाडे अज्ञात चोरट्यांनी तोडून नेल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी सुद्धा येथील चंदनाच्या झाडांची चोरी झाली आहे. त्यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेशबाबू चौबे यांनी महाराज बाग प्रशासनाकडे तक्रार करून, येथील सुरक्षा वाढविण्याची मागणी केली होती. परंतु त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता चोरट्यांनी पुन्हा संधी साधून सहा झाडांची चोरी केली आहे. या महाराज बागेत दिवसभर हजारो लोकांची वर्दळ असते. येथे शेकडो वर्षे जुनी मोठमोठी झाडे आहेत. त्यात काही चंदनाची झाडेसुद्धा आहेत. काही चोरट्यांनी दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या अंधारात येथील सहा झाडे आरीने कापून लंपास केली. जाणकारांच्या मते, चंदनाच्या लाकडाला बाजारात फार मोठी मागणी आहे. शिवाय त्याची किमतसुद्धा अधिक आहे. त्यामुळेच या झाडांची चोरी झाली आहे. येथे रात्रीच्या वेळी चौकीदारांचा पहारा असतो. मात्र असे असताना चंदनाची झाडे तोडून ती बाहेर गेलीच कशी, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घटनेने पुन्हा एकदा महाराज बागेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेसंबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी महाराज बागेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.(प्रतिनिधी)
महाराज बागेतील चंदनाची झाडे चोरीस
By admin | Published: June 13, 2016 3:12 AM