लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माता व बाल मृत्यू शून्य टक्क्यावर आणण्यासाठी आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांच्या संकल्पनेतील आर्वी तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयात ‘पायलट प्रोजेक्ट’ हाती घेण्यात आला. या ‘प्रोजेक्ट’मुळे गेल्या ११ महिन्यात उपजत मृत्यूचे (स्टील बर्थ) प्रमाण ३० टक्क्यांनी कमी झाले, शिवाय प्रसूतीची संख्या वाढली. जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत ८० ‘नॉर्मल’ तर ३१ ‘सीझर’ झाले. या रुग्णालयात स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ व बधिरीकरण तज्ज्ञ सोबतच रुग्णांच्या रहदारीसाठी आवश्यक सोय उपलब्ध करून दिल्याने रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. लवकरच हा प्रकल्प इतर ठिकाणी सुरू होण्याची शक्यता आहे.शेतकरी आत्महत्याग्रस्त वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या या ‘प्रोजेक्ट’विषयीची माहिती डॉ. संजय जयस्वाल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेतून दिली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर उपस्थित होते.डॉ. जयस्वाल म्हणाले, आर्वी येथे पूर्वी माता व बाल मृत्यू दर अधिक होता. यात मृत्यूच्या कारणामध्ये २४ टक्के रक्तविकार,१० टक्के संसर्ग (सेप्सिस), दोन टक्के उच्च रक्तदाब, एक टक्का गर्भपात, दोन टक्के हिपॅटायटिस, दोन टक्के हृदयाचे विकार यासह इतरही कारणे होती; शिवाय उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर, रक्तासह इतरही सोयींची कमतरता होती. याचा अभ्यास करून एक ‘पायलट प्रोजेक्ट’ हाती घेण्यात आला. या रुग्णालयात दोन स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ, दोन बालरोग तज्ज्ञ व दोन बधिरीकरण तज्ज्ञ उपलब्ध करून देण्यात आले. सर्व गटाचे रक्त उपलब्ध होईल यासाठी ‘ब्लड स्टोरेज’ तयार करण्यात आले. तालुक्यातील उपआरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रात होणाऱ्या प्रसूती आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयाकडे वळविण्यात आल्या. यासाठी दोन वाहने, १०८ रुग्णवाहिका एवढेच नव्हे तर गावातील खासगी वाहन उपलब्ध करून देण्यात आले. आशा वर्कर, एएनएम, आरोग्यसेवक, सेविका यांची मदत घेण्यात आली. परिणामी, उपजिल्हा रुग्णालयात आतापर्यंत एकाही माता मृत्यूची नोंद नाही, तर उपजत मृत्यूचे प्रमाण ३० टक्क्यांनी कमी झाले. प्रसूतीची संख्याही वाढली. पूर्वी महिन्यातून एक सीझर व्हायचे तिथे आता रोज सीझर होत आहेत. लोकांचा विश्वास या रुग्णालयावर वाढत आहे. यामुळे हा ‘पायलट प्रोजेक्ट’ इतरही
‘घरात प्रसूती’ झाल्या कमीडॉ. जयस्वाल यांनी सांगितले, एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या वर्षभरात नागपुरात ३५, वर्धेत २०, भंडाºयात ३८, गोंदियात ३५, चंद्रपुरात १४५, तर सर्वाधिक गडचिरोलीमध्ये १०६५ घरी प्रसूती झाल्या आहेत. यावर्षी मार्च २०१८ पासून आजपर्यंत नागपूर, वर्धा, भंडारा व गोंदियामध्ये शून्य, तर चंद्रपूर १ व गडचिरोलीमध्ये ६ प्रसूती घरी झाल्याची नोंद शासनदरबारी आहे. आरोग्यसेवा मिळत असल्यामुळे घरी प्रसूतीचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे.
‘मुंबई’चा सिद्धिविनायक ‘विदर्भाला’ पावला!आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयासाठी आवश्यक उपकरणे, यंत्रसामुग्री खरेदीसाठी अर्थसाहाय्य करण्यासाठी प्रभादेवी, मुंबईच्या सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासकडे आरोग्य सेवा संचालनालयामार्फत विनंती पत्र दिले होते. अटी व शर्तीच्या अधीन राहून मंदिर न्यासाने यंत्रे खरेदीसाठी ५० लाख ३३ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य केले. ५० लाखातून सोनोग्राफी, एक्स-रे, बेबी वॉर्मर, मॉपिंग मशीन आदी प्रमुख यंत्रांसह एकूण १४ यंत्रे व उपकरणे खरेदी करण्यात येणार आहेत.
आर्वी उपजिल्हा रुग्णालय १०० खाटांचेआर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात सध्या केवळ ५० खाटा आहेत. मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी सुमीत वानखेडे यांनी पाठपुरावा करून आर्वीत आणखी ५० खाटांची भर पाडून १०० खाटांची मंजुरी शासनाकडून मिळवली, असेही डॉ. जयस्वाल म्हणाले.