नागपूर : घरबांधणीसाठी अत्यावश्यक सिमेंट आणि सळाकीच्या किमतीत वारंवार वाढ होत असल्याचा फटका बांधकाम क्षेत्राला बसत असून घराच्या किमती वाढत आहेत. ग्राहकाने आधीच बुकिंग केलेले घर वाढीव किमतीत विकता येत नसल्याने बिल्डर्सची फसगत होत आहे. १५ दिवसांत १० रुपये किलो तर दीड महिन्यात १५ रुपये किलोने वाढ झाली आहे. सध्या दर्जानुसार ५३ ते ५६ रुपये भाव आहेत.
दरवाढीसंदर्भात क्रेडाईने पंतप्रधान आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दरवाढीवर नियंत्रण आणण्याची आणि हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, रायपूर (छत्तीसगड) येथून विदर्भात स्टीलचा पुरवठा होतो. पण गेल्या २० दिवसांपासून या मिलचालकांचे बंद आंदोलन सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणून अन्य भागातील मीलचालकांनी भाव वाढविले आहेत. सिमेंट आणि स्टील क्षेत्रातील कंपन्या कार्टेल बनवून उत्पादनाच्या किमती वाढवितात. कोरोना काळात बांधकाम क्षेत्राची हालात खराब होती. त्यातच या कंपन्यांनी दरवाढ केल्याचे संकट आणखी वाढल्याचे मत क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष जक्सेय शाह आणि अध्यक्ष सतीश मगर यांनी पत्रात म्हटले आहे.
क्रेडाई नागपूर मेट्रोचे अध्यक्ष महेश साधवानी म्हणाले, कोणत्याही कारणाविना कंपन्यांनी स्टील, सिमेंट आणि अन्य सामग्रीच्या किमती अचानक वाढल्या आहेत. एवढेच नव्हे तर मालाच्या पुरवठ्यात विलंब करीत आहेत. त्यामुळे प्रकल्पाला उशीर होतो आहे. सरकार एकीकडे किफायत घरांची गोष्ट करीत आहे, तर दुसरीकडे कंपन्यांच्या अशा अनुचित व्यवहाराने गुंतवणूक वाढली आहे. हा मुद्दा आता गंभीर झाला आहे. त्यावर शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. भाववाढीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपत्ती दर्शविली आहे.
स्टील किमतीत ४५ टक्के वाढ
साधवानी म्हणाले, वर्षभरात सिमेंटच्या किमतीत २३ टक्के आणि स्टीलच्या किमतीत ४५ टक्के वाढ झाली आहे. कोरोना काळात कंपन्यांनी सिमेंटच्या किमतीत विनाकारण वाढविल्या होत्या, तर तीन ते चार महिन्यात स्टीलच्या किमती ४० हजारांहून ५८ हजार रुपये टनावर पोहोचल्या आहेत. यावर्षी एवढी दरवाढ बांधकाम क्षेत्रात मारक ठरत आहे.