दयानंद पाईकराव/वसीम कुरेशी
नागपूर : एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने आता महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या चालकांच्या हाती बसेसचे स्टेअरिंग देण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर विभागात त्यासाठी १३५ सेवानिवृत्त चालकांची यादी तयार करण्यात आली आहे.
एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात काही दिवसांपासून संपातून माघार घेऊन कामावर रुजू झालेल्या १५ ते २० चालकांच्या भरवशावर एसटी बसेस चालविण्यात येत आहेत. मोठ्या संख्येने बसेस ठप्प असल्यामुळे एसटी महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. संपामुळे एसटीच्या बसेस चालविण्यासाठी महामंडळ अनेक पर्यायांचा विचार करीत आहे. महिनाभरापूर्वी महामंडळाने खासगी बसेसच्या आधारे सेवा सुरू करण्याचा विचार केला होता. परंतु, मागील काही अनुभवांमुळे हा प्रस्ताव अमलात आणण्यात आला नाही. आता ५ जानेवारीला एक परिपत्रक जारी करून सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांच्या हाती एसटी बसचे स्टेअरिंग देऊन बसेस चालविण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांना तीन दिवसांच्या आत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.
या आहेत अटी
-सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे वय ६२ पेक्षा अधिक नसावे.
-त्याच्या सेवाकाळात गंभीर किंवा प्राणघाती अपघात झालेला नसावा.
-त्याचे चारित्र्य व सेवा पुस्तिका चांगली असावी.
महत्त्वाच्या बाबी
-सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये मासिक वेतन देण्यात येईल.
-आठवडी रजेसोबत २६ दिवसांची ड्युटी राहील.
-पात्र उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर छाननी होईल.
-चांगल्या रस्त्यावर इच्छुक सेवानिवृत्त कर्मचारी डबल ड्युटी करू शकतील.
-काही मान्यताप्राप्त एजन्सीच्या माध्यमातून चालक घेण्यात येतील.
संप ठरणार फायद्याचा
एसटीत अनेक वर्षे काम केल्यानंतर निवृत्त झालेल्या चालकांना पेन्शनच्या रूपाने २२०० ते २५०० रुपये पेन्शन मिळते. महागाईच्या काळात इतक्या कमी रकमेत त्यांना आपल्या गरजा भागविणे शक्य होत नाही. कामासाठी फीट असलेल्या अनेक निवृत्त चालकांना कामाची संधी मिळाली आहे. त्यामुळे या चालकांसाठी एसटीचा संप फायद्याचा ठरला आहे.
अनुभवाचा होणार फायदा
‘एसटीत अनेक असे सेवानिवृत्त चालक आहेत, ज्यांना ड्रायव्हिंगचा छंद आहे. परंतु सेवेत घेण्यापूर्वी त्यांची क्षमता, सर्व्हिस रेकॉर्ड पाहण्यात येईल. यात ज्यांचे चांगले प्रदर्शन असेल, त्यांना संधी देण्यात येईल. इच्छुक सेवानिवृत्त कर्मचारी ८ जानेवारीपर्यंत अर्ज करू शकणार आहेत.’
-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, नागपूर विभाग
............