लोगो- लोकमत जागर
मोठा ताजबाग, सोमवारी क्वॉर्टर, सुर्वेनगर, दत्तात्रयनगर, सोनझरीनगर भागातील गडरलाईन नादुरुस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन वर्षापासून शहरातील विकास कामे ठप्प आहेत. अत्यावश्यक कामासाठी उपलब्ध होत नसल्याने शहरातील सर्वच भागात गडरलाईन तुंबण्याची समस्या वाढली आहे. दुसरीकडे ९० टक्के विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. मोठा ताजबाग, सोमवारी क्वॉर्टर, सुर्वेनगर, दत्तात्रयनगर, सोनझरीनगर, रघुजीनगर यासह नेहरूनगर व हनुमाननगर झोन क्षेत्रात नादुरुस्त गडरलाईनची गंभीर समस्या आहे.
मोठा ताजबाग भागात १५ ते २० वर्षांपूर्वी गडरलाईन टाकण्यात आल्या. या कालावधीत परिसरात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली. गडरलाईनवर भार वाढला. दुसरीकडे लाईन बदलण्यासाठी मनपाकडून निधी मिळत नाही. यामुळे गडरलाईन तुंबण्याचे प्रकार वाढले. जागोजागी लिकेज निर्माण झाल्याने दूषित पाणी जमिनीत मुरत असल्याने घराघरातील विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. अशीच परिस्थिती सुर्वेनगर, दत्तात्रयनगर, सोनझरीनगर, सोळंकीवाडी, सेवादलनगर वस्त्यातील आहे. यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
म्हाडा कॉलनीला ४५ ते ५० वर्षे झाली. येथील काही भागातील गडरलाईन बदलल्या, परंतु समस्या अजूनही कायम आहे. रघुजीनगर, सोमवारी क्वॉर्टर, सोमवारी पेठ, तुकडोजीनगर हनुमाननगर आदी वस्त्यातही गडरलाईनची समस्या आहे.
दक्षिण झोनमधील लक्ष्मीनगर, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर भागातील सिवरेज लाईन व चेंबर दुरुस्तीच्या प्रकल्पांतर्गत ३१ कोटींच्या कामाला काही भागात सुरुवात झाली आहे. परंतु दुरुस्तीने ही समस्या सुटणार नाही. शहरातील सिवरेज लाईन ५० ते ६० वर्षांपूर्वीच्या असल्याने लार्ईन बदलण्याची गरज आहे.
...
कंत्राटदाराची पळवापळवी
गडरलाईन व चेंबर दुरुस्तीच्या प्रकल्पांतर्गत ३१ कोटींच्या कामासाठी एकच कंत्राटदार नियुक्त करण्यात आला आहे. समस्या संपूर्ण शहरातच असल्याने वजनदार सत्ताधारी नगरसेवक कंत्राटदारावर दबाव टाकून आपल्या प्रभागात दुरुस्ती करण्याचा आग्रह धरत आहे. यामुळे वजन नसलेले नगरसेवक हतबल झाले आहेत.
...
दोन वर्षापासून कामे प्रलंबित
गडरलाईन, नाल्या दुरुस्ती अशी अत्यावश्यक कामे करण्यासाठी नगरसेवकांना वर्षाला २० लाखाचा निधी दिला जातो. परंतु दोन वर्षापासून कामे जवळपास ठप्पच आहेत. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात कोरोनाचे कारण पुढे करून थांबविण्यात आलेल्या फाईल अजूनही मार्गी लागलेल्या नाहीत, अशी माहिती नगरसेवक संजय महाकाळकर यांनी दिली. तर कंत्राटदार नियुक्त केल्यानंतरही गडरलाईनची समस्या मार्गी लागली नसल्याचे नगरसेवक सतीश होले यांनी सांगितले.