कनका गडकरी आणि पल्लवी केदार यांच्या गीतांची रंगत नागपूर : नव्या पिढीला ऱ्हीदम जास्त आवडतो. पाश्चात्त्य संगीताकडेही नव्या पिढीचा ओढा आहे. पाश्चात्त्य संगीताची वाद्ये आणि भारतीय संगीताचा बाज असलेल्या गायनाने आज रसिकांची दाद घेतली. त्यात गायक आणि वादक युवती असल्याने हा बँडच युवतींचा असल्याने नागपूरकर रसिकांनी त्यांना दाद दिली. कनका आणि पल्लवीने लिहिलेल्या गीतांना त्यांनीच संगीतबद्ध केले होते. हीच गीते आजच्या कार्यक्रमात सादर करण्यात आली. ‘अ स्टेप अहेड क्रेझी बीट्स’ या कार्यक्रमात कनकाने गीत सादरीकरणाने प्रामुख्याने युवा प्रेक्षकांची दाद घेतली. गायिका कनका गडकरी आणि युवा गिटारिस्ट पल्लवी केदार या दोन युवतींच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन साई सभागृहात करण्यात आले होते. या दोघींनी मागील वर्षी ‘क्रेझी बीट्स’ हा युवतींचा बँड सुरू केला. या बँडचे महाराष्ट्रात अनेक प्रयोग झाले. या दोघींनीच काही गीते लिहून त्याला संगीतबद्धही केले. या कार्यक्रमात या नव्या रचना सादर करण्यात आल्या. याप्रसंगी चित्रपट सृष्टीतील काही मान्यवर संगीतकारांच्या प्रतिक्रियाही एलसीडी स्क्रीनवर दाखविण्यात आल्या. कनकाने तयार केलेली ‘ओ बंदे कहा चला है तू रे’ आणि ‘ये पल है छोटासा...’ तर पल्लवीने संगीतबद्ध केलेले ‘अजनबी’ या गीताला रसिकांनी वन्समोअरची दाद देऊन गौरविले. यात वाद्यांचा सुंदर उपयोग करण्यात आला आहे. साधारण ही सगळी गीते आजच्या पिढीची होती. यानंतर कनकाने ‘तेरी गलिया..., पिया तू काहे रुठा रे.., मै तेनू संग..., लंडन ठुमकता...’ आदी गीते सादर केलीत. श्वेता शेलगावकर यांनी निवेदन केले. याप्रसंगी धनश्री, यश, नेहा, गौरव, अजय, अभिषेक यांनी विविध वाद्यांवर साथसंगत केली. (प्रतिनिधी)
‘अ स्टेप अहेड...क्रेझी बीट्स’
By admin | Published: September 28, 2014 1:03 AM