- योगेश पांडे नागपूर - राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा फटका बसला व त्यात अनेक शेतकऱ्यांनी लावलेले शेडनेट उडून गेले. या शेडनेटचा कुठलाही विमा नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अशा संकटाच्या वेळी शेतकऱ्यांना आधार मिळावा यासाठी शेडनेटसाठी विमा योजना तयार करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शेडनेटच्या नुकसानाचा मुद्दा उपस्थित केला होता. अगोदरच अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शासकीय योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी शेडनेट लावले. मात्र वादळी पावसात ते उडून गेले. शेडनेटचा समावेश कुठलाही विमा योजनेत समावेश नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या उभी ठाकली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून त्यांनी शेडनेटसाठी स्वतंत्र विमा योजना तयार करता येईल का यासाठी पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. शेडनेटची किंमत जास्त असल्याने त्याचा प्रिमियमचा भार सरकार व शेतकऱ्यांना उचलावा लागेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.