लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोल्हापूर, सांगली, बेळगाव जिल्ह्याच्या सीमाभागात पूर येण्याचे प्रमाण वाढले असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पुणे-बंगळुरू, रत्नागिरी-नागपूर यांच्यासह या जिल्ह्यांतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांच्या भरावामुळे व नद्यांवरील पुलामुळे पुराची पाणीपातळी कमी होण्यास वेळ लागतो. त्यामुळे तातडीने या महामार्गावरील पुलांचा भराव कमी करून कमानी बांधण्यात याव्या, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांना नागपुरात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.
कृष्णा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी या नद्यांवर बांधण्यात आलेल्या पुलांवर दोन्ही बाजूंना दोन-दोन किलोमीटरचा भराव आहे. पुराच्या काळात हे पूल बंधाऱ्यासारखे काम करतात व त्यामुळे नदीतील पाण्याची पातळी संथ गतीने कमी होते. केंद्र सरकारने या पुलांचे भराव कमी करून कमानी बांधकामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा व लगेच कामाला सुरुवात करावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली. गडकरी यांनी यासंदर्भात १५ दिवसांततीनही जिल्ह्यांतील महामार्गाच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांचे पथक पाठविण्याच्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
राजकीय चर्चेबाबत गुप्तता
दरम्यान, विधानपरिषदेत शेट्टी यांची वर्णी लागणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. शेट्टी यांनी महापूरग्रस्तांच्या नुकसानभरपाईसाठी महाविकास आघाडी शासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर शेट्टी व गडकरी यांच्याच नेमकी काय राजकीय चर्चा झाली हा प्रश्न उपस्थित होत आहे. या मुद्द्यावर शेट्टी यांच्याकडून काहीही प्रतिक्रिया मिळाली नाही.