लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात ९० हजार बेवारस कुत्री असून, त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मोकाट कुत्र्यांनी चावा घेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. दरवर्षी शहरातील सात ते आठ हजार नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडतात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी महापालिकेच्या मोकाट कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्याची मोहीम महापालिका राबविणार आहे. बुधवारी महाराज बाग समोरील पशुसंवर्धन विभागाच्या पशु रुग्णालयात या मोहिमेला सुरुवात केली जाणार आहे.पालकमंत्र्यांच्या जनसंवाद कार्यक्रमातही मोकाट डुकरे व कुत्र्यांबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या. मोकाट कुत्री व डुकरांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. त्यानुसार डुकरे पकडण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. तसेच शहरातील मोकाट कुत्र्यांवर नसबंदी करण्याची जबाबदारी वेस्ट फॉर अॅनिमल्स रिकगनाईज बाय अॅनिमल या संस्थेकडे सोपविण्यात आली आहे. दररोज ५० मोकाट कुत्र्यांवर नसबंदी केली जाणार आहे. सुरुवातीला सार्वजनिक ठिकाणच्या मोकाट कुत्र्यांवर नसबंदी केली जाणार आहे. यात रेल्वे स्टेशन परिसर, बसस्थानक, विमानतळ व बाजार भागातील कुत्र्यांवर लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.‘डॉग रुल २००१’नुसार मोकाट कुत्र्यांना पकडून दुसरीकडे सोडता येत नाही. त्यामुळे मोकाट कुत्र्यांना आळा घालण्यासाठी नसबंदी व उपचार हाच एकमेव पर्याय शिल्लक आहे. २००१ चा मोकाट कुत्र्याबाबतचा कायदा व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे मोकाट कुत्र्यांना पकडून दुसरीकडे नेता येत नाही. तसेच पशुप्रेमी कायद्याचा आधार घेत कुत्र्यांना पकडण्याला विरोध दर्शवितात. दुसरीकडे सक्षम यंत्रणा नव्हती. यामुळे महापालिकेचा कोंडवाडा विभाग हतबल असल्याचे चित्र मागील काही वर्षांत निर्माण झाले होते. नसबंदी मोहिमेमुळे मोकाट कुत्र्यांना काही प्रमाणात आळा बसणार आहे.नसबंदीनंतर कुत्र्यांना परत सोडणारमोकाट कुत्र्यांबाबत तक्रार आल्यास अशा कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर नसबंदी केली जाणार आहे. त्यानंतर त्याला पुन्हा त्याच ठिकाणी आणून सोडले जाणार आहे. यासाठी झोनच्या कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. ही मोहीम राबविण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध केले जाणार आहे.