सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील जैविक कचऱ्याचे (बायो-मेडिकल वेस्ट) योग्य नियोजन व व्यवस्थापनाला जेवढे महत्त्व दिले जाते, तेवढेच महत्त्व शस्त्रक्रिया गृहातून निघणाऱ्या रक्तमिश्रीत सांडपाण्याला दिले जात नाही. परिणामी, मानव व पर्यावरण दोन्ही धोक्यात येते. मेडिकल प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेत ‘राष्ट्रीय पर्यावरण व अभियांत्रिकी संशोधन संस्थे’च्या (नीरी) मदतीने ‘बायो-मेडिकल लिक्वीड’वर संशोधन करून त्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील हा पहिला प्रयोग म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.वेगवेगळ्या शस्त्रक्रियेनंतर निकामी झालेले शरीरातील अवयव किंवा ट्युमर, इंजेक्शन, आयव्ही बॉटल, प्लास्टर, कापूस, बॅण्डेज, सिरिंज, पेशंटशी संपर्कात आलेल्या आणि उपचार करताना वापरलेली प्रत्येक वस्तू ‘बायोमेडिकल वेस्ट’मध्ये मोडते. सार्वजनिक आरोग्य जपणे व पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी या कचऱ्याचे व्यवस्थापन निकोप होण्याच्या दृष्टीने ‘बायो-मेडिकल वेस्ट हॅण्डलिंग रुल्स’चे कठोरतेने पालन करण्याकडे सर्वांचेच लक्ष असते. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या संदर्भात मेयो, मेडिकलसह महानगरपालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक त्या सूचनाही केल्या. मेडिकल प्रशासनाने याच्या एक पाऊल पुढे जात नीरीच्या मदतीने थेट शस्त्रक्रिया गृहातून निघणारे रक्तमिश्रीत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प हाती घेतला. या सोबतच रुग्णालयातील संपूर्ण सांडपाण्याची व व्यावसायिक इंफल्यूअंटच्या निचऱ्यासाठीची पाईप लाईनची प्रक्रियेचा (ईटीपी/एसटीपी) प्रस्ताव शासनाकडेही पाठविला.
मेडिकल, सुपरमध्ये लागणार प्रकल्पमेडिकलमध्ये आठ तर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये चार शस्त्रक्रिया गृह आहेत. तूर्तास तरी या शस्त्रक्रिया गृहामधून निघणारे सांडपाणी गटारीमधून नाल्यात मिसळत आहे. हे केवळ याच रुग्णालयाचे नव्हे तर बहुसंख्य शासकीय व खासगी रुग्णालयांची हीच स्थिती आहे. परंतु यात सुधारणा करण्यासाठी केवळ मेडिकल प्रशासनाने नीरीच्या मदतीने पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पात सांडपाण्यातील घातक घटकावर संशोधन करून मानव व पर्यावरणाला त्यापासून धोका होणार नाही, अशी प्रक्रिया करूनच गटारीत सोडले जाईल.
मेडिकल देणार पाच लाखांचा निधीया प्रकल्पासाठी मेडिकल प्रशासन पाच लाखांची मदत करणार असून यंत्रसामुग्री व संशोधनाचा खर्च नीरी स्वत: उचलणार असल्याची माहिती आहे. या संदर्भातील एक प्रस्ताव महिनाभरापूर्वी मंत्रालयात पाठवण्यात आला आहे.
मानव व पर्यावरणासाठी हा प्रकल्पप्रदूषण नियंत्रणासाठी मेडिकल प्रशासनाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. बायोमेडिकल वेस्टचे योग्य व्यवस्थापन होत असताना, आता शस्त्रक्रिया गृहातून निघणाऱ्या घातक सांडपाण्यावर नीरीच्या मदतीने संशोधन व प्रक्रिया करण्याचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. मानव व पर्यावरणासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे.-डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल