सुमेध वाघमारे
नागपूर : कारखान्यात काम करताना किंवा अपघातात हात किंवा बोट तुटणाऱ्यांमध्ये तरुण वर्गाची संख्या मोठी आहे. त्यांचे कुटुंब त्यांच्यावर अवलंबून असल्याने याचा मोठा फटका बसतो. आयुष्यभर संबंधित व्यक्तीला दिव्यांग म्हणून जगण्याची वेळ येते. परंतु हे टाळणे शक्य आहे. त्यासाठी ‘हॅण्ड सर्जन’ची भूमिका अलिकडच्या काळात महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, गरीब व सामान्यांमध्ये अजूनही ‘हॅण्ड सर्जरी’ दुर्लक्षीत आहे. याबाबत जनजागृती होणे गरजेचे असल्याचे मत ‘इंडियन सोसायटी फार सर्जरी आॅफ दी हॅण्ड’चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र नेहेते यांनी व्यक्त केले.
‘इंडियन सोसायटी फार सर्जरी आॅफ दी हॅण्ड’(आयएसएसएच), विदर्भ आॅर्थाेपेडिक सोसायटी (व्हीओएस) नागपूर, महाराष्ट्र आॅर्थाेपेडिक असोसिएशन व सेंट्रल इंडिया असोसिएशन आॅफ प्लास्टिक सर्जन यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय परिषदेचे आयोजन नागपुरात करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते ‘लोकमत’शी बोलत होते. या परिषदेला देशभरातील नामांकित ‘हॅण्ड सर्जन’ सहभागी झाले होते. परिषदेचे आयोजक अध्यक्ष डॉ. किरण सावजी, सचिव डॉ. सम्राट टावरी, ‘आयएसएसएच’चे सचिव डॉ. अनील भट, डॉ. एस. राजा सभापती, डॉ. पंकज अहिरे, ‘व्हीओएस’चे अध्यक्ष डॉ. सत्यजीत जगताप व सचिव डॉ. समीर द्विडमुठे, डॉ. अभिजीत व्हायगावकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
- देशभरात ९०० हॅण्ड सर्जन
सुरूवातीला जेव्हा ‘हॅण्ड सर्जरी’ सुरू झाली तेव्हा कुष्ठरोगामुळे हातावर येणारी विकृतीवर ही सर्जरी व्हायची. परंतु आता शरीरापासून तुटलेले हात असेल, बोट असेल, जन्मजात हाताची विकृती असेल, चिकटलेली बोट असेल त्यांच्यासाठी ‘हॅन्ड सर्जरी' वरदान ठरत आहे. सध्या देशभरात जवळपास ९०० ‘हॅण्ड सर्जन’ आहेत. मागील दोन वर्षांपासून ‘एमसीएच हॅण्ड सर्जरी’ हा अभ्यासक्रम सुरू झाला आहे. देशात जवळपास आठ ठिकाणी फेलोशीप दिली जात असल्याचे डॉ. नेहेते म्हणाले.
-तुटलेले हात किंवा बोट प्लास्टिकच्या पिशवित टाका
डॉ. व्हायगावकर म्हणाले, शरीरापासून हात किंवा बोट तुटले असल्यास तातडीने ते एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून ती पिशवी बर्फ आणि पाणी असलेल्या दुसºया प्लास्टिकच्या पिशवीत ठेवायला हवे. ४ अंश तापमान राहिल याची काळजी घ्यायला हवी. शरीराच्या जखमेच्या जागेवर बँडेज बांधून व कमीतकमी रक्तस्त्राव होण्यासाठी हातवर करून तातडीने ‘हॅण्ड सर्जन’ गाठायला हवे.
-शस्त्रक्रिया किचकट व गुंतागुंतीची
डॉ.टावरी म्हणाले, हात हा शरीराचा असा अवयव आहे कि जिथे अनेक स्नायू, नसा-शिरा आणि छोटी हाडे दाटीवाटीने बसलेली आहेत. हात जोडणीची शस्त्रक्रिया किचकट व गुंतागुंतीची असते. म्हणूनच ' हॅन्ड सर्जरी ' या उपशाखेचा उगम झाला आहे.