आयटकची मागणी : शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा मोर्चा नागपूर : शालेय पोषण आहाराच्या जबाबदारीतून मुख्याध्यापक आणि शिक्षकांची मुक्तता करण्यात यावी. तसेच या योजनेत वर्षानुवर्षांपासून आहार शिजविण्याचे काम करणाऱ्यांना पूर्ववत कामावर कायम करण्यात यावे, या मागणीसाठी आयटकच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या महिलांनी मोर्चा काढला. संविधान चौकात धरणे दिले. कॉ. श्याम काळे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. यानंतर मागणीचे निवेदन विभागीय आयुक्तांद्वारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांना सादर करण्यात आले. निवेदनात उपरोक्त मागणीसह २ फेब्रुवारी२०११ चे परिपत्रक कायम ठेवावे व त्याप्रमाणे शालेय पोषण आहार योजनेत सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांनाच आहार शिजविण्याचे कामी कायम ठेवण्यात यावे, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना दरमहा केवळ १ हजार रुपये मानधन दिले जाते. ते ५ हजार रुपये वाढवून पूर्ण वर्षाकरिता देण्यात यावे, २६ फेब्रुवारी २०१४ च्या परिपत्रकान्वये आतापर्यंत ज्या ज्या शाळा व्यवस्थापन समित्यांनी बचत गट निवडण्याची कार्यवाही केली आहे, ती कार्यवाही रद्द करण्याचे तात्काळ आदेश देण्यात यावे, तसेच १० जुलै २०१४ च्या परिपत्रकानुसार कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना परत कामावर घेण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश होता. शिष्टमंडळात कॉ. श्याम काळे यांच्यासह शिवकुमार गणवीर, विनोद झोडगे, बी.के. जाधव, दिवाकर नागपुरे, माधुरी क्षीरसागर, कुंदा चलीलवार, एम.एच.मानकतर, शोभा रहाटे यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)
शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना कायम करा
By admin | Published: July 25, 2014 12:51 AM