नागपूर : गर्भलिंग निदान चाचणीस प्रतिबंध करण्यासाठी एखाद्या ठिकाणी ही चाचणी होत असल्यास त्या ठिकाणी बनावट रुग्ण किंवा गर्भवती माता पाठवून स्टींग ऑपरेशन (डिकॉय केसेस) करण्यात यावे, असा निर्णय ‘पीसीपीएनडीटी’ अंतर्गत जिल्हा सल्लागार समितीची बैठकीत घेण्यात आला.
मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत समिती सदस्य स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चैतन्य शेंबेकर, डॉ. वर्षा ढवळे, बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय मराठे, डॉ. वीणा खानोरकर, डॉ. कीर्तिदा अजमेरा, रेडिओलॉजिस्ट डॉ. प्रशांत ओंकार, जेनेटिसिस्ट डॉ. विनय टुले, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस उपस्थित होते.
बैठकीमध्ये नवीन सोनोग्रॉफी केंद्रांना मान्यता देणे तसेच सोनोग्रॉफी केंद्राच्या नूतनीकरण मान्यतेबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी सहा प्रकरणे समितीपुढे सादर करण्यात आली. त्यापैकी पाच केंद्रांना मान्यता देण्यात आली. उर्वरित एका प्रकरणाबाबत संबंधित डॉक्टर शासकीय सेवेत आहेत त्यामुळे त्यांना 'नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स' (एनपीए) सुद्धा मिळत असतो. त्यांनी ‘एनपीए’ मिळत नसल्याचे कार्यालय प्रमुखाचे प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांची परवानगी स्थगित ठेवण्यात आली आहे. सध्या नागपूर शहरामध्ये स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर डिसेंबर २०२० पर्यंत १००० ला ९३३ याप्रमाणे आहे.