लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संसर्गाच्या प्रकोपात उपाशी असलेल्या मजूर युवकाच्या पोटात त्याच्या साथीदाराने दाभण खुपसून, त्याला गंभीर जखमी केले आहे. ही घटना लकडगंज येथील जलाराम मंदिरातील आहे. पोलिसांनी आरोपी सुजित सिंह ईश्वर सिंह कछवा (३७, रा. न्यू ओमसाईनगर) याला अटक केली आहे तर ब्रिजमोहन सरजूराव नायककलार (३५, रा. चिखली, कळमना) हे जखमी आहेत.ब्रिजमोहन व सुजित मजुरी करतात. कोरोना प्रादुर्भावात त्यांना मजुरीचे काम मिळत नसल्याने, ते आर्थिक विवंचनेत आहेत. कामाच्या अभावामुळे दोन वेळचे जेवणही त्यांना मिळत नव्हते. म्हणून ते लकडगंज येथील जलाराम मंदिराम जेवणासाठी आले होते. जलाराम मंदिरात रोज नि:शुल्क जेवणाचे वाटप होते. दररोज शेकडोच्या संख्येने लोक याचा लाभ घेतात. ब्रिजमोहन व सुजितही येथे रोज येतात. मंगळवारी सकाळी दोघेही रांगेत लागले होते. दरम्यान धक्का लागल्याच्या कारणाने दोघांमध्ये वाद झाला. सुजितने ब्रिजमोहनला ‘लावारिस’ संबोधून शिव्या देण्यास सुरुवात केली. ब्रिजमोहनने त्याला तोंड आवरण्यास सांगून खडसावले. यामुळे रागाने लाल झालेल्या सुजितने त्याच्याजवळील सुजा (बोरी शिवण्यासाठी उपयोगात येणारी सुई) ब्रिजमोहनच्या पोटात खुपसली. त्यामुळे, ब्रिजमोहन गंभीर स्वरूपात जखमी झाला. या घटनेने परिसरात खळबळ माजली.
उपाशी मजुराच्या पोटात खुपसली दाभण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 12:21 AM