लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेकांना मारहाण करीत, अनेकांच्या वाहनांची तोडफोड करून गुंडांचे राज्य असल्याचा बनाव करणाऱ्या कुख्यात गुंडांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बुधवारी भरचौकात परेड केली. ज्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये या गुंडांनी हैदोस घालून दहशत निर्माण केली होती, त्या सर्वसामान्य नागरिकांच्या समोरच त्या गुंडांची सिनेस्टाईल नांगी ठेचून त्यांना चांगलीच अद्दल घडविली आहे. या गुडांची ती अवस्था बघून सर्वसामान्य नागपूरकरांच्या मनातील रोष काही प्रमाणात का होईना कमी करण्यात पोलिसांनी यश मिळवले आहे. परंतु, हे एवढ्यावरच थांबू नये, गुंडांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी कर्तव्यकठोर होण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे.नागपूर हे देशाचे हृदयस्थळ मानले जाते. येथे छोटीशी कोणती घटना घडली की त्याचे पडसाद सर्वदूर उमटतात. गुन्हेगारी वृत्तीच्या तरुणासोबत लिव्ह ईनमध्ये राहणाऱ्या नागपुरातील एका युवतीची तिच्या प्रियकराने हत्या केली आणि त्याचे पडसाद सर्वत्र उमटले. आघाडीची अभिनेत्री तापसी पन्नू हिने त्यावर टिष्ट्वट करून प्रतिक्रिया नोंदवली अन् नंतर त्या प्रतिक्रियेवर देशभर पुन्हा प्रतिक्रिया नोंदवल्या गेल्या. तापसीला ट्रोलही केले गेले. इकडे हा प्रकार सुरू असताना मंगळवारी पहाटे कुख्यात गुंड फैजान खान आणि त्याच्या साथीदारांनी गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रचंड हैदोस घातला. आम्हाला कुणाचाच धाक नाही, असे दर्शवत त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना मारहाण केली. कारण नसताना अनेकांच्या वाहनांची तोडफोड करून प्रचंड दहशत निर्माण केली. या शहरात आमचेच राज्य आहे, असा त्या गुंडांचा त्यावेळी अविर्भाव होता. त्यांची ती कृती नागरिकांना नव्हे तर पोलिसांना आव्हान देणारी होती. त्याचमुळे उपराजधानीत प्रचंड रोष निर्माण झाला होता. सोकावलेल्या गुंडांची नांगी का ठेचली जात नाही, असा संतप्त प्रश्न सर्वसामान्य नागपूरकर एकमेकांना विचारत होते. संवेदनशील अधिकारी म्हणून ओळखले जाणारे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी त्याची गंभीर दखल घेतली. त्यांनी नागरिकांना वेठीस धरून पोलिसांना आव्हान देणाऱ्या गुंडांना त्यांच्याच भाषेत तातडीने धडा शिकवा, असे आदेश दिले.त्यानुसार, हैदोस घालणाऱ्या गुंडांपैकी दोघांना शोधून पोलिसांनी त्यांची चांगलीच परेड घेतली. पोलीस ठाण्यात त्यांची बाजीरावने खातिरदारी केल्यानंतर त्यांना पोलिसांनी चौकात आणले. तेथे शेकडो लोकांच्या मध्ये उभे केले. त्यामुळे या गुंडांची पाचावर धारण बसली होती. काही तासांपूर्वी ज्या नागरिकांसमोर डरकाळ्या फोडून त्यांनी दहशत निर्माण केली होती, त्या शेकडो नागरिकांसमोर मान खाली घालून गुंड उभे होते. नागरिक त्यांच्यावर आपला रोष व्यक्त करण्यासाठी शिव्याशाप घालत होते आणि हे गुंड अक्षरश: अंग चोरून पोलिसांच्या पाठीमागे दडत होते. आपल्यावर संतप्त नागरिकांनी धाव घेऊ नये म्हणून पोलिसांसमोर गयावया करीत होते. पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांनी त्यावेळी तुम्ही घाबरता म्हणून हे घाबरवतात, असे म्हणत या डरपोक गुंडांना घाबरण्याचे कारण नाही, असे आश्वासक बोल सुनावत एक वेगळीच ऊर्जा नागरिकांच्या मनात भरली. त्यांची ती अवस्था आणि तो प्रसंग एखाद्या सिनेमातील दृश्यासारखा वाटत होता. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले आणि नागरिकांच्या मनातील रोष कमी होण्यास मदतही झाली. पोलिसांनी येथेच थांबू नये गुन्हेगारांना हीच भाषा समजत असेल तर त्यांच्यात दहशत निर्माण करण्यासाठी पोलिसांना असेच वागावे लागले. तरच गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होईल आणि नागरिकांमधील दहशत कमी होईल.या घटनेमुळे पुन्हा दोन गोष्टी अधोरेखित झाल्या आहेत. काही भ्रष्ट वृत्तीचे पोलीस गुंडांना मित्रांसारखी वागणूक देतात, त्यामुळे ते निर्ढावतात. एकीकडे वरिष्ठ पोलीस अधिकारी मकोका, एमपीडीएसारखी कारवाई करून गुन्हेगारांना कारागृहात डांबण्यासाठी प्रयत्नशील असतात. दुसरीकडे पोलीस ठाण्यातील मंडळी या गुंडांचे टिपर ठरतात. त्यामुळे ते राजरोसपणे गुन्हे करीत शहरात मोकाट फिरतात. फैजानच नव्हे तर अनेक तडीपार गुंडांच्या बाबतीत असे झाले आहे. फैजानचे गणेशपेठ पोलिसांसोबतचे संबंध सर्वांनाच माहिती आहे. या मैत्रीमुळे गुन्हेगारांना पोलिसांनी तयार केलेल्या कागदोपत्री अहवालातील त्रुटी (लॅकूना) माहिती होतात. त्याचाच ते फायदा उठवतात. मकोका लावल्यानंतर या त्रुटींचा तांत्रिक लाभ उठवत ते कायद्याच्या कचाट्यातून आपली मानगूट सोडवून घेतात व जामिनावर बाहेर येतात.हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विजय मोहोड हत्याकांड घडले. यातील अनेक गुन्हेगार अजून पोलिसांच्या हाती लागले नाही. विशेष म्हणजे, या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार अभय राऊत याने क्षुल्लक कारणावरून पलाश नामक तरुणाची हत्या केली होती. त्याने ४४ घाव घालून पलाशला निर्दयपणे संपविले होते.जामिनावर बाहेर आल्यानंतर तो पुन्हा गुन्हेगारीत सक्रिय झाला आणि त्याने साथीदारांच्या मदतीने विजय मोहोडची हत्या केली. याही वेळी अभय आणि त्याच्या साथीदारांनी विजय मोहोडवर ३५ ते ४० घाव घातले. त्यावरून त्याची क्रूरता स्पष्ट होते.तोच नव्हे तर असे शहरात अनेक गुन्हेगार आहेत, ज्यांनी एका हत्येच्या गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा दुसºया कुणाची हत्या केली आहे. अनेक गुन्हेगार जामिनावर बाहेर येताच पुन्हा हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, खंडणी वसुली, लुटमारीसारखे गंभीर गुन्हे करतात. त्यामुळे अशा गुन्हेगारांना नियंत्रित करण्यासाठी कागदोपत्री भक्कम पुरावे त्यांच्याविरुद्ध तयार करण्याची गरज आहे आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवणाºया पोलिसांनाही धडा शिकविण्याची गरज आहे.गुन्हेगार ज्या भाषेत समजत असेल त्याच भाषेत पोलीस त्यांना समजावतील. गुन्हेगारी सोडून चांगल्या मार्गावर यावे, समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे, असे जर त्यांना वाटत नसेल आणि ते सर्वसामान्य नागरिकांना दहशतीत आणण्याचे प्रयत्न करत असतील तर अशा गुन्हेगारांना वठणीवर आणण्यास पोलीस सक्षम आहे. त्यांची गय केली जाणार नाही.डॉ. भूषणकुमार उपाध्यायपोलीस आयुक्त, नागपूर
गुंडांची नांगी ठेचलीच पाहिजे : परेड आवश्यक आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 11:29 PM
अनेकांना मारहाण करीत, अनेकांच्या वाहनांची तोडफोड करून गुंडांचे राज्य असल्याचा बनाव करणाऱ्या कुख्यात गुंडांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बुधवारी भरचौकात परेड केली. ज्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये या गुंडांनी हैदोस घालून दहशत निर्माण केली होती, त्या सर्वसामान्य नागरिकांच्या समोरच त्या गुंडांची सिनेस्टाईल नांगी ठेचून त्यांना चांगलीच अद्दल घडविली आहे. या गुडांची ती अवस्था बघून सर्वसामान्य नागपूरकरांच्या मनातील रोष काही प्रमाणात का होईना कमी करण्यात पोलिसांनी यश मिळवले आहे. परंतु, हे एवढ्यावरच थांबू नये, गुंडांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी कर्तव्यकठोर होण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे.
ठळक मुद्देगणेशपेठ प्रकरणाची दहशत : नागरिकांचा रोष निवळण्यास मदतनिर्ढावलेल्या गुन्हेगारांचा क्लास व्हायलाच पाहिजे