१२३ क्विंटल चणा जप्त : पुरवठा विभागाची कारवाई नागपूर : वाढत्या भावावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी धडक मोहिमेंतर्गत कामठी तालुक्यातील महालगावच्या माँ उमा कोल स्टोरेजच्या गोदामावर टाकलेल्या धाडीत १२३ क्विंटल चण्याचा साठा जप्त केला आहे. तसेच इतवारी येथील मे. केशव सेल्स अॅण्ड मार्केटिंगच्या गोदामातील सोयाबीन व इतर तेलाचे मिळून १५२ तेलाचे टिनाचे डबे जप्त केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.बाजारात तूर व चणा डाळीच्या वाढीवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने जिल्हा पुरवठा विभागातर्फे विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून महालगाव येथील माँ उमा कोल स्टोरेजच्या गोदामामध्ये १२३ क्विंटल चण्याचा साठा योग्य पुराव्याअभावी पुढील चौकशी पावेतो डिटेन करून ठेवण्यात आला आहे. हा साठा गुजरात सिड्स प्रा.लि. यांच्या नावे साठवणूक करून ठेवला असून त्याची किंमत ९ लाख ८४ हजार आहे.त्याचप्रमाणे इतवारी येथील केशव सेल्स अॅण्ड मार्केटिंगच्या गोदामातील सोयाबीन तेल व इतर तेलाचे मिळून १५२ डबे जप्त करण्यात आले आहे. या तेलाची अंदाजे किंमत १ लाख ५२ हजार रुपये असून शुक्रवारी टाकलेल्या धाडीमध्ये एकूण ११ लाख २६ हजार रुपयाचा साठा जप्त करण्यात आला आहे. पुढील कारवाई जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत करण्यात येत आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी, अन्नधान्य वितरण अधिकारी प्रशांत काळे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी उज्वला तेलमासरे, सहायक अन्नधान्य वितरण अधिकारी शेखर पुनसे, निरीक्षक पी.एल. कुबडे, प्रशांत शेंडे, रमेश चव्हाण, शैलेश सहारे यांनी ही कारवाई केली.(प्रतिनिधी)
साठेबाज रडारवर
By admin | Published: October 22, 2016 2:29 AM