लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अजनीत कुख्यात गुन्हेगाराच्या घरी छापा घालून गुन्हे शाखेच्या युनिट चारमधील पथकाने घातक शस्त्रांचा साठा जप्त केला. या प्रकरणी दोन गुंडांना अटक करण्यात आली.गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पथक प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम आणि त्यांचे सहकारी गुरुवारी सायंकाळी अजनी परिसरात गस्त करीत होते. पथकातील एएसआय रमेश उमाठे यांना प्रतीक सुनील फुलझेले (वय २१) आणि कार्तिक अशोक शर्मा (वय २५, रा. हावरापेठ) या गुंडांनी मोठ्या प्रमाणात घातक शस्त्रे लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलीस पथकाने ओंकारनगर चौकाजवळ असलेल्या घरी छापा घातला. पोलिसांना तेथे तलवार, चाकू अशी १० घातक शस्त्रे मिळाली. ती जप्त करून आरोपी फुलझेले आणि शर्मा या दोघांना अटक करण्यात आली.
विशेष म्हणजे, दोनही आरोपी कुख्यात गुंड असून आरोपी शर्मा याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात हत्या, हत्येचा प्रयत्न, जुगार तसेच दरोड्यासह एकूण सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. शर्मा याचा भाऊ आरोपी रजत ऊर्फ लल्ला राजकुमार शर्मा हा सध्या कारागृहात बंद आहे. तो बहुचर्चित विजय मोहोड हत्याकांडातील आरोपी आहे. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट प्रमुख अशोक मेश्राम यांच्या नेतृत्वात एपीआय के. व्ही. चौगुले, दिलीप चंदन, एएसआय रमेश उमाठे, हवालदार राजकुमार शर्मा, नायक नितीन आकोटे, सचिन तुमसरे, आशिष क्षीरसागर, नायक सतीश ठाकरे यांनी ही कामगिरी बजावली.
कारागृहात जाण्यापूर्वी दिली शस्त्रे
आरोपी रजत ऊर्फ लल्ला शर्मा याने कारागृहात जाण्याच्या ६ महिन्यांपूर्वी त्याचा लहान भाऊ कार्तिक शर्मा याला शस्त्रे लपवून ठेवण्यास सांगितले होते, अशी प्राथमिक माहिती आरोपींकडून पुढे आली आहे. त्याची पोलीस शहानिशा करीत आहेत. दरम्यान, या कारवाईमुळे मोठा गंभीर गुन्हा टळण्यास मदत झाली आहे.