लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य प्रदेशातून मोठा मद्यसाठा घेऊन नागपुरात येणाऱ्या ट्रक आणि आर्टिगा कारला बेलतरोडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री सिनेस्टाईल ताब्यात घेतले. ट्रक आणि कारमधून साडेसात लाख रुपयांचे वेगवेगळ्या प्रकारचे मद्य पोलिसांनी जप्त केले. दरम्यान, दोन वाहने आणि त्यातील मद्यसाठा सोडून मद्यतस्कर तिसऱ्या वाहनातून पळून गेले.बेलतरोडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय आकोत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातून नागपुरात दारूची मोठी खेप येणार असल्याची टीप त्यांना शुक्रवारी रात्री १० वाजता मिळाली. त्यामुळे त्यांनी आऊटर रिंग रोड वर सापळा लावला. रात्री १०.३० च्या दरम्यान एक ट्रक आणि त्याच्या मागे दोन कार येत असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा करूनही ट्रकचालक किंवा आर्टिगा तसेच एक्सयूव्ही या तीनही वाहनचालकांनी आपली वाहने न थांबवता जोरात दामटली. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग सुरू केला. एम्प्रेस पॅलेस राणी कोठी बायपास रोडवर ट्रक आणि आर्टिगा चालकाने आपली वाहने थांबविली आणि त्यातून उडी घेत त्यांच्यासोबत असलेल्या एक्सयूव्ही वाहनातून आरोपी पळून गेले. पोलिसांनी ट्रक क्रमांक एमएच ४९/ २२९६ आणि आर्टिगा कार क्रमांक एमएच ३४/ एम ९५५४ ही दोन वाहने ताब्यात घेतली. त्यांची तपासणी केली असता ट्रकच्या केबिनच्या मागच्या बाजूला एक छोटेसे कम्पार्टमेंट तयार करून त्यात दारुचा साठा लपविण्यात आला होता. त्याचप्रमाणे कारमधेही मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्याचे बॉक्स होते. पोलिसांनी त्यातील लिजेंड प्रीमियम विस्की, आॅफिसर चॉईस, प्रेस्टीज विस्की बाटल्यांचे बॉक्स, ट्रक आणि आर्टिका असा एकूण २४ लाख, २५ हजार, २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
नंबर प्लेट बनावट
पोलिसांनी ट्रक आणि कारच्या नंबर प्लेटवरून मालकाचा पत्ता लावण्याचा प्रयत्न. मात्र दोन्ही वाहनांच्या नंबर प्लेट बनावट असल्याचे स्पष्ट झाले. ही कारवाई पोलीस उपायुक्त निर्मलादेवी, सहायक आयुक्त विजयकुमार मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलतरोडीचे ठाणेदार विजय आकोत, पोलीस उपनिरीक्षक उत्तम जायभाये, हवालदार तेजराम देवळे, नायक गोपाल देशमुख, विजय श्रीवास, राकेश रुद्रकार, प्रशांत सोनवलकर आणि मनोज शाहू यांनी ही कामगिरी बजावली.
लोकमतने केला होता खुलासाविशेष उल्लेखनीय असे की, चार दिवसांपूर्वी ‘लोकमत'ने नागपुरात मध्य प्रदेशातून प्रतिबंधित मद्याची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याचा खुलासा केला होता. बेलतरोडी पोलिसांनी या वृत्ताची दखल घेऊन खबरे पेरल्याने शहाणे नामक मद्यतस्कर शुक्रवारी मद्याची मोठी खेप घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यामुळेच मद्याचा साठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले.