लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पीएचडी नोंदणीसाठी अनिवार्य असलेल्या पेटचे (पीएचडी एन्ट्रन्स टेस्ट) आयोजन २८ व २९ ऑगस्ट रोजी होणार आहे. कोरोना नियंत्रणात आला असल्याने पेटची परीक्षा प्रत्यक्ष परीक्षा केंद्रांवर होणार आहे. शहरातील ११ परीक्षा केंद्रांवर हे आयोजन करण्यात आले असून, ४ हजार १९२ परीक्षार्थी पीएचडी नोंदणीसाठी पात्र होण्याचा प्रयत्न करणार आहेत.
कोरोना व नंतर उन्हाळी परीक्षा यामुळे पेटच्या आयोजनाला फटका बसला. पेटसाठी अर्ज सादर करण्याची अखेरची तारीख २४ एप्रिल ही होती. मात्र, कोरोनामुळे अनेक निर्बंध लागू करण्यात आले व विद्यापीठाने १५ मेपर्यंत मुदत दिली होती. सुधारित वेळापत्रकानुसार २८ व २९ ऑगस्ट रोजी विविध टप्प्यात चारही विद्याशाखांची ऑनलाईन परीक्षा होईल. ही परीक्षा विद्यापीठाने नियोजित केलेल्या परीक्षा केंद्रांवर जाऊनच देता येणार आहे.
डॉ. आर. जी. भोयर व डॉ. पेशवे यांच्या अध्यक्षतेखालील दोन समित्यांनी पीएचडीच्या जाचक अटींमध्ये बदल करीत नवा शिफारशीचा समावेश केला होता. त्यानुसार विद्यापीठाने शिफारशी मान्य केल्या असून, पीएचडीसंदर्भात अधिसूचना काढली. यंदाच्या पेटमध्ये ‘रिसर्च मेथडॉलॉजी’ आणि ‘ॲप्टिट्यूड’वर भर देण्यात येणार आहे. पहिल्या सेक्शनमध्ये ‘रिसर्च मेथडॉलॉजी’ आणि ‘ॲप्टिट्यूड’चे प्रश्न असतील, तर दुसऱ्या सेक्शनमध्ये विषयनिहाय प्रश्न राहतील.
६३ विषयांसाठी होणार परीक्षा
विद्यापीठाने चारही विद्याशाखा मिळून एकूण ६३ विषयांसाठी पेट घेण्याचे निश्चित केले आहे. विज्ञान व तंत्रज्ञानमध्ये सर्वाधिक २९ विषयांचा समावेश आहे. मानव्यशास्त्र विद्याशाखेतील २२ विषयांसाठी पेट घेण्यात येईल, तर आंतरशास्त्रीय व वाणिज्य-व्यवस्थापनमधील अनुक्रमे ८ व ४ विषयांसाठी परीक्षा होईल.
...असे आहे वेळापत्रक
दिनांक - वेळ - विद्याशाखा
२८ ऑगस्ट - सकाळी १० ते दुपारी १ - विज्ञान व तंत्रज्ञान
२९ ऑगस्ट - सकाळी १० ते दुपारी १ - वाणिज्य व व्यवस्थापन
२९ ऑगस्ट - सकाळी १० ते दुपारी १- आंतरशास्त्रीय
२९ ऑगस्ट - दुपारी २ ते सायंकाळी ५ - मानव्यशास्त्र